...म्हणून भाजपा नितीन गडकरींचा पत्ता कट करण्याची शक्यता; ठाकरे गटाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:09 PM2024-03-05T12:09:37+5:302024-03-05T12:10:16+5:30
राजनाथ सिंह यांच्यासारखे गळ्यात हार घालायची धडपड करायची आणि अमित शाहांनी डोळे वटारल्यावर मागे जायचं हे उद्योग गडकरींनी केल्याचं आम्ही पाहिले नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं.
मुंबई - Sanjay Raut on Nitin Gadkari ( Marathi News ) महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचे, डावलायचे आणि आपल्या पायाखाली आणायचे अशाप्रकारे षडयंत्र रचलं जात आहे.काही लोक आज देशात असे आहेत जे उघडपणे भाष्य करतात, त्यात नितीन गडकरी आहेत असं म्हणत आगामी लोकसभेला नितीन गडकरींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे असा दावा ठाकरे गटानं केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, आज देशात जो विकास दिसतोय. त्यातले सर्वात मोठे योगदान नितीन गडकरी सांभाळत असलेल्या खात्याचे आहे. २०२४ साली भाजपाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भाजपा २२०-२२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही. अशा व्यक्तीला भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर सर्वमान्य उमेदवार म्हणून जर नितीन गडकरीचं नाव पुढे केले तर त्यासाठी गडकरी दिल्लीत असू नयेत म्हणून नितीन गडकरींचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच नितीन गडकरींना का डावललं हे स्पष्ट केलंय. गडकरी परखड, स्पष्टवक्ते आहेत. शिवाजी महाराजांचे भक्त असल्याने ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे. आम्ही त्यांना ओळखतो, त्यांचे आमचे मतभेद पण आम्ही त्यांच्यासोबत जवळून काम केलंय. गडकरी विकासाला महत्त्व देतात. ढोंगबाजी आणि फसवेगिरीला देत नाहीत. चार दिवसांपूर्वीच गडकरी बोलले होते. या देशातील शेतकरी, मजूर, कष्टकारी दु:खी आहे, समाधानी नाही. एखाद्या मंत्र्यांमध्ये असं बोलण्याची हिंमत आहे का? गडकरी व्यासपीठावर स्वाभिमानाने उभे असतात. राजनाथ सिंह यांच्यासारखे गळ्यात हार घालायची धडपड करायची आणि अमित शाहांनी डोळे वटारल्यावर मागे जायचं हे उद्योग गडकरींनी केल्याचं आम्ही पाहिले नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार असं बोलले, पण कुटुंबातील कुणाला रोजगार दिला नाही. रोजगार तुमच्या वेगळ्या परिवाराला दिला. या घराणेशाहीच्या खोट्या भूलथापावर आता जनता विश्वास ठेवणार नाही. जे धनिक आणि शेठ लोक हा तुमचा परिवार आहे. जे खासदार, आमदार ५०-५० खोके घेऊन खरेदी केले तो तुमचा परिवार आहे. जो तुमच्यासाठी खोटी कामे करतो, जो अंधभक्त आहे तो तुमचा परिवार आहे. १४० कोटी जनतेबाबत तुम्ही बोलत असाल तर आम्हीही त्यात आहोत. परंतु आम्ही तुमच्या परिवारातील नाही अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.