'भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही'; शिंदेंच्या शिवसेनेत माढ्यातून पहिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 01:33 PM2024-03-14T13:33:36+5:302024-03-14T13:34:08+5:30
बारामतीत विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलेले असताना आता माढ्यामध्ये लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखाने जय महाराष्ट्र केला आहे.
महायुतीमध्ये सत्तेसाठी पक्षांची जुळणी केली तरी कार्यकर्ते आणि नेत्यांची मने काही जुळलेली दिसत नाहीत. तिन्ही पक्षांमध्ये आधीच्या लढ्यांच्या जखमा अद्याप ताज्याच असल्याचे दिसत आहे. बारामतीत विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलेले असताना आता माढ्यामध्ये भाजपचा प्रचार करणार नाही, असे म्हणत शिंदेंच्या लोकसभा संपर्क प्रमुखांनी राजीनामा दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही. त्यामुळे राजीनामा देत असल्याची भुमिका कोकाटे यांनी घेतली आहे.
तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचेही कोकाटे यांनी सांगितले. भाजप मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही आरोप त्यांनी केला. माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वितुष्ट आले होते. एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रयत्नशील होते. कुरघोड्या केल्या जात होत्या. फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री पाच वर्षे खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. अजित पवारांची राष्ट्रवादी तर विरोधातच होती. परंतु भाजपा मित्रपक्ष असूनही मदत करत नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. ती आता शिंदेंसोबत गेले तरीही कायम आहे.