धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा उतरणार रस्त्यावर, आरोप-प्रत्यारोप सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 03:28 AM2021-01-17T03:28:02+5:302021-01-17T03:29:13+5:30
बलात्काराचा आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो मागितला पाहिजे. परंतु, पवारांनी या प्रकरणी घुमजाव केले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या धनंजय मुंडे प्रकरणाचा धुरळा अजून उडतोच आहे. त्यात आज भाजपने भर घातली.
बलात्काराचा आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो मागितला पाहिजे. परंतु, पवारांनी या प्रकरणी घुमजाव केले आहे. पवारांकडून ही भूमिका अपेक्षित नव्हती, असे सांगत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून (दि. १८) भाजपाच्या महिला आघाडीकडून राज्यभर तहसीलदार कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये असते, तर राजीनामा घेतला असता : हुसेन दलवाई
दुसरीकडे सत्तेतील सहकारी काँग्रेस पक्षानेही राष्ट्रवादी काँग्रेसला मुंडे प्रकरणात घरचा अहेर दिला आहे. ‘मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता’ असे माजी खासदार आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे. कोकणात चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वक्तव्य केले आहे.