महाराष्ट्रात केवळ एवढ्या जागा जिंकू शकेल भाजपा? अंतर्गत सर्व्हेनं पक्षाचं टेन्शन वाढवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:38 PM2024-08-01T14:38:45+5:302024-08-01T14:40:12+5:30
लोकसभा निवडणुकीचा विचार करता, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या. यामुळे, यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा विचार करता, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या. यामुळे, यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपा आपल्या कामगिरीसंदर्बात चिंतित दिसत आहे. भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागाच मिळू शकतात, असे दिसत आहे. यापूर्वी भाजपाला 2014 मध्ये 122 तर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या.
संघही नाराज
संबंधित वृत्तानुसार, भाजपा आणि अजित पवार यांच्या युतीमुळे संघ नाराज आहे. यापूर्वी, 'ऑर्गनायझर'मध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या खराब कामगिरीचे कारण अजित पवार असल्याचे म्हणण्यात आले होते. याशिवाय, सघ आणि भाजपाचे काही कार्यकर्तेही या युतीमुळे नाराज असल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान -
बुधवारी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुख म्हणाले की, मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. पण हे सगळे सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे. मी तडफेने उतरलो आहे. तेव्हा एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन."