काय सांगता? भाजपानं चक्क ओवेसींना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 07:07 IST2020-02-29T03:16:39+5:302020-02-29T07:07:39+5:30
नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी ओवेसी यांची सभा गुरुवारी टावरे स्टेडियम येथे होणार होती. या सभेवर भाजपने आक्षेप घेत सभा होऊ न देण्याचा निश्चय शेट्टी यांनी केला होता.

काय सांगता? भाजपानं चक्क ओवेसींना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं प्रकरण
भिवंडी : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या जाहीर सभेला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी यू टर्न घेत मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या सभेस मात्र भाजपच्या शुभेच्छा आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ओवेसींची सभा उधळून लावू, असा निर्धार भाजप नेत्यांनी केला होता. अखेर, पोलिसांनी एमआयएम कार्यकर्त्यांची मनधरणी करून सभा रद्द करण्याची विनंती केली होती. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी एमआयएमने एक पाऊल मागे घेत सभा रद्द केली. मात्र, पुढील महिन्यात होणाºया सभेस शुभेच्छा देत या वादावर पडदा टाकला आहे.
नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी ओवेसी यांची सभा गुरुवारी टावरे स्टेडियम येथे होणार होती. या सभेवर भाजपने आक्षेप घेत सभा होऊ न देण्याचा निश्चय शेट्टी यांनी केला होता. त्यास एमआयएमने उत्तर देत सभा होणारच. दम असेल रोखून दाखवावी, असे प्रतिआव्हान शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी दिले होते. यामुळे शहरातील वातावरण तापले होते.