डम्पर आंदोलनातून सेना-भाजपाने घेतली माघार
By admin | Published: March 9, 2016 06:11 AM2016-03-09T06:11:52+5:302016-03-09T06:11:52+5:30
कोकण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांमुळे सेना-भाजपाच्या नेत्यांनी डम्पर आंदोलन मागे घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठप्प असलेला गौणखनिज व्यवसाय उद्यापासून सुरू होणार
सिंधुदुर्ग : कोकण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांमुळे सेना-भाजपाच्या नेत्यांनी डम्पर आंदोलन मागे घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठप्प असलेला गौणखनिज व्यवसाय उद्यापासून सुरू होणार असल्याचे शिवसेना आमदार वैभव नाईक व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले; तर काँग्रेस प्रणीत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत आणि अशोक सावंत यांनी जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेले डम्पर आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे.
गेल्या पाच दिवसांपासून डम्पर चालक-मालक संघटनेचे जिल्हा प्रशासनाच्या धोरणाविरोधात जिल्हा मुख्यालयात आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जोपर्यंत लेखी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान, आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्यामुळे या सर्वपक्षीय आंदोलनाची दिशा काँग्रेस विरुद्ध शिवसेना-भाजपा अशी झाली होती. त्या दिवसापासून शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांच्या संपर्कात होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे सिंधुदुर्गात दाखल झाले. या वेळी भाजपा व सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत मागण्या मांडल्या. आयुक्तांबरोबच्या चर्चेनंतर आम्ही समाधानी असून, आंदोलन मागे घेत आहोत व उद्यापासून सर्व व्यावसायिक काम सुरू करतील, असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली असली तरी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत डम्पर चालक-मालक संघटनेचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आग्रही भूमिका काँग्रेस प्रणीत संघटनांनी जाहीर केली. (प्रतिनिधी)
> नीतेश राणेंवरील गुन्हे मागे घ्या
आमदार नीतेश राणे हे आमचे प्रश्न मांडण्यासाठी आले होते. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही अपमानास्पद असून, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केल्याचे संदेश व अशोक सावंत यांनी सांगितले. कोकण विभागीय आयुक्त व कोकण परिक्षेत्रीय पोलीस महासंचालकांशी याबाबत चर्चा झाली असून, जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली होणारच, असेही राजन तेली म्हणाले.