भाजप यंग ब्रिगेडला मंत्रिपदाची आस; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:03 AM2022-07-07T10:03:48+5:302022-07-07T10:04:11+5:30
विदर्भातील आकाश फुंडकर, परिणय फुके, बंटी भांगडिया, समीर मेघे, मोहन मते यांची नावेही चर्चेत आहेत
मुंबई : भारतीय जनता पक्षातील दिग्गजांना कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना यंग ब्रिगेडला राज्यमंत्रिपदाची आस लागली आहे.
भाजपचे दोन आमदार हे केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र आहेत. नारायण राणे यांचे पुत्र नीतेश आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे दोघेही विधानसभेचे सदस्य आहेत. एका घरात एकच पद हा निकष भाजपच्या श्रेष्ठींनी लावला तर नीतेश आणि संतोष या दोघांनाही मंत्रिपदापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाकडे कोकणातील उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोन मोठे नेते आहेत. अशावेळी कोकणात भाजपचाही दबदबा असावा, यासाठी नीतेश राणे यांच्याबाबत अपवाद केला जाईल का, याबाबत उत्सुकता आहे.
विदर्भातील आकाश फुंडकर, परिणय फुके, बंटी भांगडिया, समीर मेघे, मोहन मते यांची नावेही चर्चेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सचिन कल्याणशेट्टी व राम सातपुते हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय मुंबईतील अमित साटम, नाशिकचे राहुल आहेर, पुण्याचे सुनील कांबळे, अमरावती जिल्ह्यातील प्रताप अडसड, अकोल्याचे रणधीर सावरकर यांची नावेही चर्चेत आहेत. महिला आमदारांमध्ये माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मनीषा चौधरी यांची नावे मंत्रिपदासाठी विचाराधीन असल्याचे समजते.