"सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 04:05 PM2023-09-03T16:05:40+5:302023-09-03T16:06:22+5:30

BJP4Maharashtra slams INDIA Opposition Alliance : आघाडीवरून भाजपाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

BJP4Maharashtra slams INDIA Opposition Alliance and Thackeray, gandhi, pawar family | "सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज"

फोटो - BJP

googlenewsNext

इंडिया आघाडीत संयोजक कोण? हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने अखेर समन्वय समितीने त्यावर तोडगा काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीची रणनीती १४ जणांची समिती ठरवणार आहे. या समितीत  काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार आहे. 

आघाडीवरून भाजपाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "बेरोजगार घराणेशाही वाचवण्यासाठी तयार झाली घमंडीया आघाडी" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज..." म्हणत भाजपाने खोचक टोला लगावला आहे. भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. 

इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण अखेर लांबणीवर पडले. आघाडीत नवीन पक्ष आल्याने त्यांचेही या लोगोवर एकमत होणे आवश्यक असल्याने अनावरण पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. एक-दोन दिवसात लोगोचे अनावरण दिल्लीत होईल, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत. हे सर्व लोगो नव्याने आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावर अंतिम निर्णय होईल.  

घमेंडिया कोण हे देश बघतोय -  शरद पवार
इंडिया आघाडीचा उल्लेख भाजपाचे नेते ‘घमेंडिया आघाडी’ असा करतात. मात्र, आम्ही केवळ एकत्र येण्याची चर्चा केली तरी त्यावर भाजपाचे नेते टीका करतात. आम्ही भेटलो तर त्यावरही टीका करतात. यावरून असे दिसते की, १० वर्ष देशाची सत्ता भोगूनही हे जमिनीवर नाहीत. यावरून घमेंडिया कोण आहे हे दिसते. आमच्यावर कितीही टीका केली तरी आता आम्ही थांबणार नाही. 

आम्ही विरोधक नाही, तर देशप्रेमी - उद्धव ठाकरे 
परिवारवाद म्हणून आमच्यावर टीका केली जाते. पाटण्याच्या बैठकीत मी सांगितले होते की, भारत माझा परिवार आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही विरोधक नाही तर देशप्रेमी आहोत. देशाला वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. मुंबईतील बैठकीत इंडियाची ताकद वाढली. दिवसेंदिवस इंडिया मजबूत होत आहे. त्यामुळे एनडीएच्या मनात भीती वाढली आहे. 
 

Web Title: BJP4Maharashtra slams INDIA Opposition Alliance and Thackeray, gandhi, pawar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.