भाजपाचे आंदोलन सेनेने हाणले
By admin | Published: September 15, 2016 02:22 AM2016-09-15T02:22:00+5:302016-09-15T02:22:00+5:30
दिव्यातील रस्त्यांची दुरवस्था व अन्य नागरी समस्या सोडवण्याकरिता लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांना सुबुद्धी मिळावी
ठाणे : दिव्यातील रस्त्यांची दुरवस्था व अन्य नागरी समस्या सोडवण्याकरिता लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांना सुबुद्धी मिळावी, याकरिता महापालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करण्याकरिता निघालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना शिवसेनेने पोलिसांवर दबाव टाकून रोखल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तरीही, गनिमी काव्याने काही कार्यकर्ते मुख्यालयापाशी पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन हाणून पाडले.
दिव्यातील भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी गणेशपूजन करू न दिल्याने दिवावासीय संतप्त झाले आहेत. शिवसेना आणि पालिका प्रशासनाने आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी हे आंदोलन चिरडल्याचा आरोप मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिव्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि या समस्या सोडवण्याची बुद्धी पालिका प्रशासन व स्थानिक आमदार, नगरसेवक यांना मिळावी, या उद्देशाने दिवा मंडळाचे भाजपाचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी पालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करून श्री गणेशाला दिवा विकासाचे गाऱ्हाणे घालण्याचे निश्चित केले असल्याचे पोलीस, पालिका प्रशासन यांना लेखी पत्राद्वारे कळवले होते.
पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने या गाऱ्हाण्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिवावासीय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर गणेशपूजनासाठी निघाले असताना पोलिसांनी दिवावासीयांच्या गाड्या दिव्यात अडवून ठेवल्या. गणेशपूजनासाठी नेण्यात येणारी मूर्ती मुंब्रा पोलिसांनी कार्यकर्त्यांसह खारेगाव येथे ताब्यात घेतली. तरीही, मुंडे व निवडक १० ते १२ कार्यकर्ते गनिमी काव्याने पालिका मुख्यालयासमोर पोहोचले. गणेशपूजन करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गणेशपूजनाचा कार्यक्रम हाणून पाडला.
याबाबत, मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्यांच्या भयानक स्थितीबाबत आम्ही वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दिव्यातील रस्ते व खड्डे याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबतचे पत्रही आम्ही महापौर व प्रशासनाला दिले होते. मात्र, प्रशासन दिवावासीयांना गांभीर्याने घेत नसल्याची स्थानिकांची भावना आहे. दिव्याच्या पायाभूत सुविधांसाठी कोणतीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी पालकमंत्री आणि स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.