काँग्रेसच्या ३५ वर्षांच्या सत्तेला भाजपाचा सुरुंग
By admin | Published: February 24, 2017 04:53 AM2017-02-24T04:53:01+5:302017-02-24T04:53:01+5:30
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या निधनानंतर काँग्रेस पोरकी झाली. काँग्रेसच्या ३५ वर्षाच्या
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या निधनानंतर काँग्रेस पोरकी झाली. काँग्रेसच्या ३५ वर्षाच्या स्थापनेपासूनच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावीत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत मिळवीत मांड ठोकली. ५८ पैकी भाजपाला ३६ जागा मिळाल्या तर ३५ वरुन काँग्रेस १५ वर घसरली. राष्ट्रवादी पाचवर तर सेना एक आणि अपक्ष एक असे जिल्हा परिषदेत चित्र राहिले.
लातूर जि. प. त काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र भाजपा लाटेसमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. राष्ट्रवादीशी आघाडी करुनही काँग्रेस बॅकफूटवर गेली. भाजपाचे नेतृत्व करणाऱ्या पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांचे लातुरात वर्चस्व निर्माण होऊन पुन्हा एकदा लातूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या किल्ल्या ‘निलंगेकरां’च्या हाती गेल्याचे संकेत मिळाले. देशमुखांच्या गढीचे वारस धीरज देशमुख यांचा विजय झाला असला तरी काँग्रेसच्या हातून जि. प. चा गड गेला. ते विक्रमी मतांनी निवडून येतील असा दावाही फोल ठरुन अवघ्या ३२०० नीच जिंकले. काँग्रेसला जबरदस्त धक्का म्हणजे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या पत्नी मावळत्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकरांचा पराभव. याशिवाय, सभागृहातील काँग्रेस गटनेते दिलीप पाटील नागराळकर पडले. त्यांचे बंधू बस्वराज पाटील नागराळकर हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आहेत, हे विशेष. माजी उपाध्यक्ष शेषराव पाटील ‘पंजा’वर हरले. (प्रतिनिधी)
लातूर
पक्षजागा
भाजपा३६
शिवसेना०१
काँग्रेस१५
राष्ट्रवादी०५
इतर०१