भाजपाच्या आशिष शेलारांकडून कोट्यवधींंचा घोटाळा - प्रीती मेनन
By admin | Published: June 18, 2017 01:02 AM2017-06-18T01:02:51+5:302017-06-18T01:02:51+5:30
आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. तूरडाळीपासून बचत गट आणि मनी लाँड्रिंगसह ४५ घोटाळ्यांत शेलार यांचा सहभाग आहे.
मात्र, त्याबाबत तक्रार देऊनही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि सत्ताधारी पक्ष त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. तथापि, शेलार यांनी मेनन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जाणीवपूर्वक व वैयक्तिक द्वेषातून आपल्याविरुद्ध आरोप करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रीती मेनन म्हणाल्या, ‘शेलार हे संचालक असलेल्या सर्वेश्वर आणि रिद्धी या कंपन्या कसलाही व्यवसाय करत नाहीत, तरीही इतका पैसा कमावत आहे. याबाबत ‘आप’च्या वतीने गेल्यावर्षी जुलैमध्ये एसीबी, ईडीसह सीबीआयकडे तक्रार नोंदविली आहे.
मात्र, अद्यापपर्यंत एकाही तपास यंत्रणेने त्याची दखल घेतलेली नाही. ‘राष्ट्रवादी’चे नेते छगन भुजबळ यांची चौकशी करण्यासाठी जी तत्परता दाखवली, काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या घरावर छापे टाकले जातात. या तपासांमध्ये जितकी तत्परता दाखवली जाते, तितकी शेलारांच्या तक्रारीबाबत का दाखविली जात नाही, असा सवाल मेनन यांनी केला.
सत्ताधारी पक्षाकडून स्वपक्षीय नेत्याला वाचविण्यात येत असून, मुंबई दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व आरोप बिनबुडाचे : शेलार
आशिष शेलार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘आप’ने केलेले आरोप जुनेच असून, त्याचा वेळोवेळी मी सविस्तर कागदपत्रांसह खुलासा केलेला आहे. सर्वेश्वर आणि रिद्धी या दोन कंपन्यांशी आता माझा कोणताही संबंध नाही. माझी कुणाशीही भागीदारी नसून, कोणत्याही कंपनीच्या संचालक मंडळावर नाही.