मराठा क्रांती मोर्चा : भाजपाच्या आशिष शेलारांना आझाद मैदानात येण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 10:52 AM2017-08-09T10:52:59+5:302017-08-09T11:17:09+5:30

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानावर धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला.

BJP's Ashish Shelar may not be allowed to come to Azad Maidan | मराठा क्रांती मोर्चा : भाजपाच्या आशिष शेलारांना आझाद मैदानात येण्यास मज्जाव

मराठा क्रांती मोर्चा : भाजपाच्या आशिष शेलारांना आझाद मैदानात येण्यास मज्जाव

googlenewsNext

मुंबई, दि. 9 - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानावर धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला. 'आधी आरक्षण द्या, त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी व्हा', अशी मागणी करत आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी आशिष शेलार यांना मैदानात येण्यास मज्जाव केला. आशिष शेलार यांनी मात्रे ही बाब फेटाळून लावली आहे.  

दरम्यान, आशिष शेलार सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वाराने चार पोलिसांच्या सुरक्षा कवचात आझाद मैदानात दाखल झाले होते. यावेळी आरक्षणाची मागणी करत आक्रमक झालेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले व तुम्ही परत माघारी फिरा, असे सांगत त्यांना मैदान परिसरात येण्यास रोखले. यावेळी जमावाचा रोष पाहून शेलार यांनी आझाद मैदानातून निघून जाणेच योग्य असल्याचे समजले व तेथून ते निघाले. 

मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात 

दरम्यान, मुंबईतून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून लाखो मोर्चेकरी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ असे वातावरण निर्माण झाले आहे. समन्वय समितीने मोर्चाचे सुयोग्य नियोजन केले आहे. आंदोलकांच्या चहा-नाश्तापासून पिण्याचे पाणी, शौचालय, आदी सोयींसह मार्गदर्शनासाठी ६ हजार स्वयंसेवक सज्ज आहेत. त्यांना विशेष टी-शर्ट आणि ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

शाळांना सुटी : दक्षिण मुंबईतील शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
२० हजार पोलीस
मोर्चासाठी २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरले आहेत.  पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्तही येथे आहेत.
जड वाहनांना बंदी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरूवारी सकाळपर्यंत जड वाहनांना बंदी आहे.

चेंबूरपासून वळवा वाहने
भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.

‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.

प्रश्न तत्काळ सोडवा : राणे
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी तिथे प्रतिज्ञापत्र सादर करताना राज्य सरकारने मराठा समाजाची ठाम भूमिका मांडावी. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ या समाजावर येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय सुविधा सज्ज
छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

Web Title: BJP's Ashish Shelar may not be allowed to come to Azad Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.