सदाभाऊ खोत यांना संधी देताना भाजपाकडून विश्वासघात, राजू शेट्टींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 07:54 PM2017-08-19T19:54:42+5:302017-08-19T19:54:52+5:30
‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.
सांगली, दि. 19 - ‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. सदाभाऊंना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपने विश्वासघात करून त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
कृषी राज्यमंत्री खोत यांनी शुक्रवारी खा. शेट्टींवर जोरदार टीका केली होती. त्या आरोपांचा शेट्टी यांनी येथे समाचार घेतला. खा. शेट्टी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपबरोबर आघाडी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेची एक जागा आणि एक मंत्रीपद देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार विधानपरिषदेसाठी आम्ही संघटनेकडून सदाभाऊ खोत यांच्या नावाची शिफारस केली. मात्र विधानपरिषदेचा अर्ज भरताना भाजपच्या नेत्यांनी विश्वासघात करून भाजपाच्या चिन्हावर त्यांचा अर्ज भरून घेतला. त्यामुळेच सदाभाऊ सध्या डरकाळी फोडत आहेत. मात्र संघटना सोबत नसती तर सदाभाऊ, तुम्हाला भाजपने विधानपरिषद आणि मंत्रिपदावर तरी ठेवले असते का? याचे राज्यातील लाखो शेतकरी साक्षीदार आहेत.
मंत्रिपदासाठी शेतकºयांचा तरी विश्वासघात करू नका. तुमच्याकडे थोडा जरी सन्मान असेल तर, संघटनेच्या जोरावर मिळविलेल्या मंत्रिपदावरून दूर व्हा. पुन्हा खुशाल मंत्री झाल्यास आमचा त्याला काहीच आक्षेप नसेल. ते म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवावी, असे खोत यांचे मत आहे. प्रत्यक्षात मी कोठून निवडणूक लढवावी, यासाठी खोत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी शेतकºयांचा नेता असून, ते सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी तयार आहे. माझ्या निवडणुकांचा सर्व खर्च शेतकरीच करत असल्यामुळे मला कधीच भीती वाटत नाही. शेतकरी सांगतील त्या राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून मी निवडणूक लढवेन, पण तुमची काय अवस्था होणार आहे, ते आगामी निवडणुकीत शेतकरीच तुम्हाला दाखवून देतील.
संघटनेतील कारभाराबद्दल कार्यकर्तेच उत्तर देतील
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत हुकूमशाही पध्दतीने कारभार असता तर, सदाभाऊ तुम्ही मंत्री म्हणून राज्यभर मिरवले असता का, हे तुमच्या मनाला तुम्हीच विचारा. संघटनेत कशापध्दतीने कारभार चालतो, याविषयी मी सांगण्यापेक्षा कार्यकर्त्यांनीच त्यावर उत्तर देणे योग्य ठरेल. मीच संघटनेच्या कारभाराबद्दल सांगून माझी स्तुती केल्याप्रमाणे होईल, असा खुलासाही खा. शेट्टी यांनी केला.
माझ्या भानगडींची सीआयडी चौकशी करा
माझा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला आणि लहानाचा मोठाही शेतकरी चळवळीतच झालो. मी जर भानगडी, साखर सम्राटांबरोबर दलाली आणि संघटनेचा राजकीय ‘व्यवसाय’ केला असता, तर जिल्हा परिषद ते खासदार पदापर्यंत शेतक-यांनी मला कधीच संधी दिली नसती. शेतकºयांशी गद्दारी करणे आमच्या रक्तातच नाही. तरीही तुम्ही म्हणत असाल तर, भानगडींची सीआयडी चौकशी करून मला तुरुंगात टाका, असे आव्हान खा. शेट्टी यांनी सदाभाऊंना दिले.
सदाभाऊ, तुम्ही साधू संत... हरिभक्त!
सदाभाऊ खोत किती स्वच्छ कारभार करतात, याचा अनुभव राज्यातील जनतेने घेतला आहे. शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या पारदर्शी कारभाराची चांगलीच कल्पना आहे. त्यांचा कारभार साधू संत, हरिभक्ताप्रमाणे कसा चालू आहे, याचा प्रत्यय सर्वांनाच आला आहे. सदाभाऊंना माझ्या कारभाराबद्दल बोलण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही खा. शेट्टी यांनी केली.