‘दुबई’ वॉर्डात आघाडीला भाजपाचे आव्हान
By admin | Published: February 4, 2017 09:48 PM2017-02-04T21:48:24+5:302017-02-04T21:48:24+5:30
आघाडीसह भाजपाकडूनही तीन मुस्लीम उमेदवार रिंगणात
नाशिक : मुख्य जुने नाशिक असलेल्या प्रभाग १४ अर्थात ‘दुबई वॉर्ड’मधून कॉँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा लढविणार आहे. आघाडीने या प्रभागातून एकूण तीन मुस्लीम उमेदवार दिले असून, भाजपानेदेखील या उमेदवारांचे प्रतिस्पर्धी म्हणून तीन मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.
मागील पंचवार्षिकमध्येही दुबई वॉर्डातून आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. एकूणच द्विसदस्सीय प्रभाग पद्धतीने त्यावेळी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या दुबई वॉर्डात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले होते. यंदा पुन्हा बहुसदस्स्यीय प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी-कॉँग्रेसची आघाडी झाली आहे. कॉँग्रेसने दोन जागा लढविण्याचे निश्चित केले आहे. विद्यमान नगरसेवक सुफी जीन यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस सर्वसाधारण गटातून एकमेव जागा लढविणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्या पद्धतीने समान जागावाटप आघाडीकडून करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही आघाडीकडून समान जागावाटप करण्यात आल्या आहेत. कॉँग्रेसने दोन जागांवर महिला उमेदवार तर राष्ट्रवादीने दोन जागांवर एक महिला एक पुरुष उमेदवार दिले आहेत. कॉँग्रेसने विद्यमान नगरसेवक समीना मेमन यांना पुन्हा संधी दिली असून, दुसऱ्या जागेवरून कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी शेख हनीफ बशीर यांच्या मातोश्री शहानूर शेख यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीने संजय साबळे यांच्या पत्नी शोभा साबळे यांना तिकिट दिले असून, विद्यमान अपक्ष नगरसेवक साबळे यांना तिकीट नाकारण्यात आले आहे.