निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष आले; रोहित पवारांसह कार्यकर्ते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 07:10 PM2023-12-12T19:10:38+5:302023-12-12T19:11:05+5:30
शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नावर सरकारला निवेदन देण्यासाठी पवार आंदोलकांसह विधानसभेकडे जात होते.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विधिमंडळाकडे मोर्चासह जात असताना ताब्यात घेण्यात आले आहे. शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नावर सरकारला निवेदन देण्यासाठी पवार तिकडे जात होते. यावेळी राज्य सरकारकडून कोणीच न येता भाजपाचे शहर अध्यक्ष आल्याने रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते संतापले. यातून गोंधळ उडाल्याने रोहित पवारांसह, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर, सलील देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स बाजुला करण्याचा प्रयत्न केला होता. रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे समारोप झाला. यावेळी या ठिकाणी शरद पवार, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
पोलिसांनी जवळपास १२ हून अधिक गाड्या भरून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नंतर रोहित पवारांसह अन्य नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवेळी बंटी शेळके नावाचा कार्यकर्ता जखमी झाला आहे.
सरकारने जबाबदार व्यक्तीला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवावे, अशी मागणी करत रोहित पवारांनी असे झाले नाही तर आपण विधानभवनवर जाणार असा इशारा दिला होता. परंतु, सरकारकडून कोणी आले नाही, तिथे भाजपाचे शहर अध्यक्ष निवेदन स्वीकारण्यासाठी दाखल झाले. यावरून तिथे तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एबीपीने दिले आहे.