भाजपाचा ‘कोल्ड प्ले’ गरिबांचा बँड वाजविण्यासाठीच!
By admin | Published: November 4, 2016 05:26 AM2016-11-04T05:26:50+5:302016-11-04T05:26:50+5:30
युती सरकारच्या काळात शिवसेनेने मुंबईत पॉप सिंगर मायकेल जॅक्सनला आणून नाचविले होते
मुंबई : युती सरकारच्या काळात शिवसेनेने मुंबईत पॉप सिंगर मायकेल जॅक्सनला आणून नाचविले होते; आता गरिबी हटविण्याच्या नावाखाली ब्रिटनच्या ‘कोल्ड प्ले’ बॅण्डला मुंबईत आणण्याचा भाजपाने प्रयत्न चालविला आहे. परंतु हा बॅण्ड गरिबी हटविण्यासाठी नव्हे, तर गरिबांचा बॅण्ड वाजविण्यासाठी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या माध्यमातून ब्रिटनमधील कोल्ड प्ले बॅण्ड मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बॅण्डला सरकारने सवलत देण्याचा तसेच एमएमआरडीएचे मैदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इतर कार्यक्रमांना जे कर लावले जातात, तेच कर या कार्यक्रमाला लावले जावेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पाळा येथे रामचंद्र शिक्षण संस्थेच्या नानाभाऊ कोकरे आश्रमशाळेत, आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकरण गंभीर असून यातील दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच या अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन आदिवासी विकासमंत्री आणि महिला व बालविकासमंत्री यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील सर्वच आश्रमशाळांतील मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी करून तेथील लहान मुलां-मुलींवर अत्याचार होत आहेत का, याचीही माहिती सरकारने घेऊन योग्य ती उपाययोजना तातडीने करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
>फसव्या जाहिराती
सध्या वर्तमानपत्रे तसेच टेलिव्हिजनवरून ‘महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र घडतोय’ या घोषवाक्याने सरकारच्या दोन वर्षांतील कामांचे जोरदार मार्केटिंग केले जात आहे. मात्र सरकारच्या या जाहिराती फसव्या असून यातून राज्यातील जनतेची फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मलिक म्हणाले.