भाजपाचे खान्देशात ‘डॅमेज कंट्रोल!’
By admin | Published: July 5, 2016 01:07 AM2016-07-05T01:07:06+5:302016-07-05T01:07:06+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर खान्देशातील बहुजन समाजामधील नाराजी दूर करण्यासाठीच धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे
- मिलिंद कुलकर्णी, जळगाव
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर खान्देशातील बहुजन समाजामधील नाराजी दूर करण्यासाठीच धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून भाजपा नेतृत्वाने एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत. मूळ शिवसैनिक असलेले डॉ. भामरे हे पहिल्यांदाच खासदार झालेले असतानाही त्यांंना मंत्रिपद देऊन खडसेंना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. भामरे हे धुळे जिल्ह्यातील मालपूर (ता. साक्री) येथील रहिवासी. त्यांना राजकीय वारसा आहे. आजोबा सीताराम गोविंद पाटील हे सत्यशोधक चळवळीतील अग्रणी नेते होते. पुढे कम्युनिस्ट पक्षात ते सक्रिय झाले. वडील रामराव पाटील यांनीही कम्युनिस्ट पक्षापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु पुढे ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले.
आई गोजरताई भामरे या १९७२ ते ७८ या काळात साक्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या. परंतु रामराव पाटील यांनी धुळे व कुुसुंबा मतदारसंघातून एकेकदा निवडणूक लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही.
राजकीय वारसा आणि वडिलांचे सहकार क्षेत्रातील कार्य पाठीशी असूनही डॉ. सुभाष भामरे हे राजकारणात सक्रिय नव्हते. ते कर्करोग तज्ज्ञ म्हणून धुळ्यात प्रसिद्ध होते. एक सेवाभावी डॉक्टर हीच त्यांची खरी ओळख. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेतर्फे विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु त्यांना अपयश आले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अचानक भामरे यांचे नाव चर्चेत आले. नितीन गडकरी यांच्यापर्यंत भामरे यांचे नाव पोहोचले आणि त्यांचे तिकीट निश्चित झाले.
गटातटापासून दूर
डॉ. भामरे हे दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे आणि जयकुमार रावल हे भाजपाचे दोन उमेदवार पुन्हा निवडून आले. गोटे आणि भामरे यांनी धुळ्यात एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली होती. त्यांचे संबंध धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या मंजुरीवरून ताणले गेले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या भेटीची छायाचित्रे, रेकाँर्डिंग पत्रकार परिषदांमध्ये ऐकविण्यापर्यंत वाद विकोपाला गेले होते.
पक्षात दोन्ही नवीन असले तरी गोटे हे खडसे समर्थक म्हटले जातात. खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतरदेखील गोटे उघडपणे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.
धुळ्यात जल्लोष! : धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार असल्याचा संपूर्ण शहरात जल्लोष करण्यात आला. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची बातमी धुळ्यात येऊन धडकताच शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जल्लोष केला. डॉ. भामरे यांच्या रूपाने धुळे जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळत आहे. पहिल्यांदा काँग्रेसच्या राजवटीत इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात विजय नवल पाटील यांना दळणवळण राज्यमंत्रिपद मिळाले होते.
डॉ़ सुभाष भामरे यांनी खासदारच नव्हे तर मंत्री होऊन धुळ्याचा चेहरामोहरा बदलावा, अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली आहे़ या मंत्रिपदामुळे विकास होण्यास मदत होणार आहे़ आम्हाला हा निर्णय अनपेक्षित होता़ - रामराव पाटील, वडील