भाजपाकडून विदर्भवाद्यांचा अपेक्षाभंग; गडकरी, फडणवीस यांना स्थान नाही - श्रीहरी अणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:37 AM2017-11-12T00:37:13+5:302017-11-12T00:37:28+5:30
केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती. परंतु, भाजपाने अपेक्षाभंगच नव्हे तर, हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे.
यवतमाळ : केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती. परंतु, भाजपाने अपेक्षाभंगच नव्हे तर, हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस माझ्यावर विदर्भाचीही जबाबदारी आहे, असे ठासून का सांगत नाहीत, असा सवाल माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी शुक्रवारी केला.
यवतमाळात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असता पत्रकार परिषदेत अॅड. अणे बोलत होते. ते म्हणाले, केवळ विदर्भाच्या मुद्यावर लढणारा कुठलाही पक्ष नसल्याने आम्ही भाजपाला सहकार्य केले होते. पण आता विदर्भ राज्य आघाडी २०१९ मध्ये स्वत:च्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने केवळ मोदींच्या लाटेत विदर्भ जिंकला नाही. तर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या नावाने मते मागितली म्हणून विजय मिळवता आला. मात्र आता पक्षात फक्त मोदी उरलेत. गडकरी, फडणवीस यांना पक्षात स्थान नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाच्या जागा नक्कीच कमी होणार आहेत. त्या जागा काँग्रेसलाही मिळणार नाहीत. तर विदर्भासाठी झगडणाºया पक्षालाच मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.