भाजपाच्या शिस्तबद्ध पक्ष प्रतिमेला धक्का
By Admin | Published: April 19, 2017 04:26 AM2017-04-19T04:26:22+5:302017-04-19T04:26:22+5:30
स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून झालेल्या वादात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील पक्षाचे व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयाची मोडतोड
पुणे : स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून झालेल्या वादात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील पक्षाचे व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयाची मोडतोड केल्याच्या प्रकाराने शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत वादात महापालिकेच्या मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपाचे ९८ नगरसेवक निवडून देत पुणेकरांनी मोठे बहुमत दिले असताना भाजपाने पुणेकरांचा विश्वासघात केला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील भाजपा कार्यालय व सभागृह नेत्यांची भाजपा कार्यकर्त्यांकडून मंगळवारी मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली. भाजपाच्या नगरसेवकांनी ७ वर्षांपूर्वी याच तिसऱ्या मजल्यावर केलेल्या मोडतोडीची पुनरावृत्ती झाली. महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये २०१० मध्ये दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालामधून हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्या वेळीही पक्षाच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची मोडतोड केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आदी पक्षांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)