एलईडी दिवे लावण्याचे भाजपाचे स्वप्न भंगले...
By admin | Published: September 25, 2016 06:00 AM2016-09-25T06:00:42+5:302016-09-25T06:00:42+5:30
मुंबईत एलईडी दिवे बसवण्याचे स्वप्न भंग झाल्यानंतर, बेस्टमार्फत प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपाला, शिवसेनेने शह दिला आहे. कुलाबा, कफ परेड ते माहीम
मुंबई : मुंबईत एलईडी दिवे बसवण्याचे स्वप्न भंग झाल्यानंतर, बेस्टमार्फत प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपाला, शिवसेनेने शह दिला आहे. कुलाबा, कफ परेड ते माहीम-सायन एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये शिवसेना व विरोधी पक्षाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून भाजपा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे.
मरिन ड्राइव्हवर पिवळे दिवे बदलून, पांढरे दिवे बसवण्याचा भाजपाच्या प्रकल्पाला मित्रपक्ष शिवसेनेनेच सुरुंग लावला होता. भाजपानेही हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत, शिवसेनेवर तोफ डागली होती. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये ट्विटर युद्ध रंगले होते. मात्र, न्यायालयातूनच दट्ट्या पडल्यानंतर, मरिन ड्राइव्हवरील पांढरे दिवे उतरविले होते. मात्र, भाजपाचा पांढऱ्या दिव्यांचा शौक काही संपलेला नाही. भाजपाच्या अधिपत्याखाली असलेल्या बेस्टच्या माध्यमातून, मुंबईतील ४,००० दिवे बदलून एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव आणण्यात आला. (प्रतिनिधी)
एलईडी ठरतील खर्चीक
3.45 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, हा प्रस्तावही मित्रपक्ष आणि विरोधकांनी बहुमताच्या जोरावर फेटाळल्याने, भाजपाला दणका बसला आहे. उपक्रम कर्जबाजारी असताना, असे दिवे लावणे खर्चीक ठरेल, असा मुद्दा शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केला. या प्रकल्पासाठी पालिका आर्थिक तरतूद करीत असल्यास, समितीला काही हरकत नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतली.
प्रशासनाच्या माध्यमातून साकार होईल स्वप्न : सत्ताधारी आणि विरोधकांनी कोंडी केली, तरी बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनामार्फत हा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे पाठवून, आर्थिक मदत मागण्यात येणार आहे.