भाजपाची अशीही घराणेशाही
By Admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:44+5:302016-04-03T03:50:44+5:30
भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली, पण या कार्यकारिणीत नेत्यांचे पुत्र आणि कन्यांचा भरणा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली, पण या कार्यकारिणीत नेत्यांचे पुत्र आणि कन्यांचा भरणा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष यांना सरचिटणीसपद देण्यात आले आहे. आणखी एक सरचिटणीस प्रवीण दटके हे नागपूरचे महापौर असले तरी त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहेच. त्यांचे वडील नागपूर भाजपाचे अध्यक्ष होते.
उपाध्यक्षपद मिळालेले खामगावचे (जि. बुलडाणा) आमदार आकाश फुंडकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. हेच पद मिळालेले आ. तुषार राठोड यांचे वडीलही आमदार होते. याच पदावर वर्णी लागलेले अमरावती जिल्ह्यातील प्रताप अडसड हे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचे चिरंजीव आहेत.
उपाध्यक्षपद मिळालेल्या अॅड. कल्याणी रहाटकर या भाजपाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या कन्या आहेत. दुसऱ्या अॅड. स्वरदा केळकर या सांगलीच्या नगरसेविका असून भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांच्या कन्या आहेत. उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले भिवंडीचे देवेश पाटील हे स्थानिक खासदार कपिल पाटील यांचे पुतणे आहेत.
चिटणीसपदाची संधी मिळालेले लातूरचे राहुल केंद्रे हे भाजपाचे नेते गोविंद केंद्रे यांचे चिरंजीव आहेत. भाजपासाठी आपली हयात दिलेले दिवंगत मोतिराम लहाने यांचे नातू अक्षय (जि.प. सदस्य) चिटणीस झाले आहेत. मनसे सोडून भाजपामध्ये आलेले वाशिमचे राजू पाटील राजे उपाध्यक्ष झाले आहेत. जिल्ह्यात पक्षासाठी काही वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या आहेत.
मेदनकर वाडी; चाकण (जि. पुणे) येथील सरपंच प्रियंका मेदनकर यांना चिटणीसपद देण्यात आले. त्या राज्यातील सर्वात तरुण सरपंचांपैकी आहेत. (विशेष प्रतिनिधी)
नेत्यांची मुले या निकषावर कोणाचीही वर्णी लावलेली नाही. त्यांचे पक्षातील काम आणि त्यांनी स्वत:ची निर्माण केलेली प्रतिमा हेच निकष लावले आहेत. नेतापुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातोय त्यांच्यापैकी बहुतेक आधीच्याही कार्यकारिणीत होते.
- आ. योगेश टिळेकर, अध्यक्ष, प्रदेश भाजपा युवामोर्चा