शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजपची अनुकूलता म्हणजे निव्वळ ‘फार्स’
By admin | Published: March 9, 2017 04:47 PM2017-03-09T16:47:19+5:302017-03-09T16:48:58+5:30
शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असल्याचा दावा म्हणजे निव्वळ एक‘फार्स’ आहे. कर्जमाफीची
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असल्याचा दावा म्हणजे निव्वळ एक‘फार्स’ आहे. कर्जमाफीची मागणी मान्य असेल तर सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राज्य सरकारला दिले आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज ठप्प झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " प्रारंभी भारतीय जनता पक्ष कर्जमाफीच्या विरोधात होता. परंतु, शेतकरी आणि विरोधी पक्षांमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफी करू, असे सांगू लागले आहेत. परंतु, ही योग्य वेळ येणार तरी केव्हा? कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी सरकार दिल्लीच्या आदेशाची प्रतीक्षा करते आहे की नागपूरच्या?"
"सरकारने तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी आहे. शिवसेनाही या मागणीसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता कर्जमाफीची घोषणा करावी. वेळकाढूपणा करून अधिक शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करू नये," असेही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
तत्पूर्वी गुरूवारी सकाळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. तीच आक्रमकता विधानसभेतही दिसून आली. काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्जमाफीच्या तात्काळ घोषणेसाठी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृहाचे कामकाम तीन वेळा ठप्प झाले व त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.