छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; आशिष शेलार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:41 PM2024-08-27T15:41:42+5:302024-08-27T15:45:12+5:30
BJP on shivaji statue collapse: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेवर सत्ताधारी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली.
Ashish Shelar On shivaji statue collapsed: 'राजकीय भाष्य करणार नाही, पण सरकारच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो', अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली. मुंबईत माध्यमांशी बोलताना आशिष शेलारांनी घडलेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली. महाराजांचा अपमान महाराष्ट्र आणि देश सहन करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
विक्रोळीमध्ये आरंभच्या दहीहंडी उत्सवाला आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना शेलारांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेबद्दल भाष्य केले. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.
"मला यावर कोणतेही राजकीय भाष्य करायचे नाही. जी घटना घडली, ती दुर्दैवी, वेदनाजनक, क्लेशदायक, दुःखदायक आहे", असे शेलार म्हणाले.
सगळ्या गोष्टी समोर येतील -आशिष शेलार
"संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. आमच्या राजाच्या कुठल्याही पद्धतीचा अपमान हा महाराष्ट्र काय, संपूर्ण हिंदुस्थान सहन करू शकत नाही. यामागे कोण आहे? कसे घडले? काय घडले? दोषी कोण आहेत? एफआरआय काय? या सगळ्या गोष्टी समोर येतील", अशी ग्वाही शेलार यांनी यावेळी बोलताना दिली.
"जी घटना घडली, ती कुठल्याही कारणाने घडली. याबद्दल खरंतर महाराष्ट्राच्या जनतेची सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण, या सगळ्यातून हा पुतळा उभा करू. आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू याबद्दल कटिबद्धता सांगतो", अशी भूमिका शेलार यांनी मांडली.
'किती लज्जास्पद आहे हे'; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
या घटनेवरून राजकारण तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे.
"आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याच्या बाबतीतही भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं... इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे... इथेही कामाचा दर्जा भयानक आहे... इथेही भावनेला नव्हे तर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करण्यात आलंय", असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याच्या बाबतीतही भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं...
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 27, 2024
इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे...
इथेही कामाचा दर्जा भयानक आहे...
इथेही भावनेला नव्हे तर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करण्यात आलंय...
आणि मग, त्यांचे…
"आणि मग, त्यांचे नेहमीचेच ट्रोल्स आणि निर्लज्ज राजकारणी आता दोष भारतीय नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. किती लज्जास्पद आहे हे", अशी टीका आदित्य ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.