भाजपाचे आघाडीअस्त्र
By admin | Published: March 16, 2017 03:00 AM2017-03-16T03:00:48+5:302017-03-16T03:00:48+5:30
उत्तर प्रदेशातील राजकारणात मुस्लिम मतांचा विचार न करता एकगठ्ठा हिंदू मतांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी भिवंडी पालिकेसाठी
भिवंडी : उत्तर प्रदेशातील राजकारणात मुस्लिम मतांचा विचार न करता एकगठ्ठा हिंदू मतांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी भिवंडी पालिकेसाठी मात्र वेगवेगळ््या पक्षांची आणि फुटीर नेत्यांची आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इतर पक्षातील फुटीर नेते तयार होणार नसल्याने आणि मुस्लिम मते गमावणे परवडणार नसल्याने शहर विकास किंवा त्या स्वरूपाची आघाडी करून सत्ता हस्तगत करण्याच्या भाजपाच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
त्याचवेळी काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या आघाडीचा प्रयोग उत्तर प्रदेशात यशस्वी झाला नसला, तरी त्या पक्षांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम समाजातील काही गटांना एकत्र आणण्याची गरज समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी व्यक्त केल्याने भिवंडी महापालिकेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या न्ॉिवडणुकीत दोन आघाड्यांची लढाई होण्याची शक्यता आहे. शिवसेना मात्र या दोन्ही आघाड्यांपासून अलिप्त राहून वेगळी लढेल, असेच आताचे चित्र आहे.
भिवंडीच्या मागील निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले. आताही शिवसेना भाजपासोबत जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेवत भाजपाने काँग्रेससह वेगवेगळ््या पक्षातील फुटीरांना एकत्र करण्याच्या हालचाली अंतिम टप्पयात आणल्या आहेत. भाजपाची भिवंडीतील स्वबळाची ताकद किरकोळ आहे. त्या तुलनेत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसमधील एका गटाशी भाजपाच्या नेत्यांनी संधान बांधले आहे. (प्रतिनिधी)
भिवंडीत प्रभावी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील एक गट इतका भाजपा नेत्यांच्या सोबत आहे, की प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी तो गट त्यांच्या स्वागतालाही फिरकला नाही.
फक्त विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दौऱ्यावेळी त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानावरून सुरू असलेल्या खटल्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते राहूल गांधी अनेकदा भिवंडीत आले. त्यावेळी पक्षाने शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला.
त्यानंतरही आंदोलने झाली. त्यामुळे पक्ष चर्चेत असला तरी निवडून येण्याच्या क्षमतेचे नेते जर फुटले, तर पक्षाची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनोज म्हात्रे यांच्या हत्येनंतर पक्षाच्या चार नेत्यांनी सलग दौरे करत पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला.
या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार कपिल पाटील हे एकहाती पालिका निवडणूक हाताळणार असल्याने म्हात्रे हत्या प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले. त्यातही पक्षाचा गट फोडण्याचे प्रयत्न होत असल्याने या टीकेची धार दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे.
भिवंडी : भाजपाने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशांत यश संपादन केले असून ते लोकशाहीस मारक आहे. हिंदू- मुस्लिमांना विभक्त करण्यासाठी सुरू असलेले भाजपाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे.समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भिवंडीच्या निवडणुकीते लढावे, असे आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केले. हिंदू-मुस्लिमांत फूट पाडत भाजपा देशांत अराजकता माजवण्याच्या स्थितीत आहे. भाजपाविरोधात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. नोटाबंदी झाली. त्याचा फटका गोरगरीबांना बसला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबल्या नाहीत. असे असूनही भाजपा बहुमताने निवडून येतो, हे आश्चर्य असल्याचे ते म्हणाले.
तेलगू, उत्तर भारतीय, मराठी भाषकांचे गट, गुजराती-मारवाडी गटांवर भाजपाची भिस्त आहे. मुस्लिमांचाही एक गट सोबत ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी वेगवेगळ््या गटातील प्रभावी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसोबत सध्या गुप्त बैठका सुरू असून त्यातून भाजपापुरस्कृत आघाडी आकाराला येते आहे.
प्रभागरचनेची अडचण
ठाणे, उल्हासनगरप्रमाणे चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने उमेदवाराला पक्षाच्या चिन्हाखेरीजी निवडून येणे कठीण आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फौज नसलेल्या उमेदवारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे आघाडी झाली आणि तिला एक चिन्ह मिळाले, तर सर्व गटांची सोय होईल, असे मानले जाते.