मित्रपक्षांना विश्वासात घेण्याची भाजपची हमी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:07 AM2023-06-28T10:07:32+5:302023-06-28T10:07:55+5:30
BJP: भाजपने आपल्या लहान मित्रपक्षांचे बोट सोडल्याची टीका होत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयात लहान - मोठ्या सर्वच मित्रपक्षांची एक बैठक घेतली.
मुंबई : भाजपने आपल्या लहान मित्रपक्षांचे बोट सोडल्याची टीका होत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयात लहान - मोठ्या सर्वच मित्रपक्षांची एक बैठक घेतली. यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच पुढे जाऊ. मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत दर महिन्याला बैठक घेऊ, असा शब्द त्यांनी दिला.
या बैठकीला शिवसेनेतर्फे शंभुराज देसाई, उदय सामंत, रयत क्रांती संघटनेचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रिपाइंचे अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे तानाजीराव शिंदे, पीरिपाचे जयदीप कवाडे, तसेच आ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या रासपाचे आणि माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या बरिएमंचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आमच्याकडे लोक अडचणी घेऊन येतात. त्या सरकारच्या माध्यमातून सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. ते होणार नसेल तर लोक आमच्यासोबत आणि पर्यायाने महायुतीसोबत येणार नाहीत, अशी भावना मित्रपक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शिवस्मारक, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आदी विषयांवर चर्चा झाली. महामंडळांवरील नियुक्त्या लवकर कराव्यात, तालुका, जिल्हा समित्यांवरील नियुक्त्यांमध्येही मित्रपक्षांना सामावून घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
महिन्यातून एकदा समन्वय बैठक
महायुती म्हणून आपण एकत्रितपणे आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाऊ, भाजप आपल्या कोणत्याही मित्रपक्षाला अंतर देणार नाही, असा शब्द बावनकुळे यांनी दिला. सर्व मित्रपक्षांची महिन्यातून एकदा समन्वयाची बैठक होईल. पुढच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.