भाजपाच्या 'त्या' नेत्यांनी फोन करून दिली होती ऑफर; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:32 PM2023-02-02T17:32:22+5:302023-02-02T17:32:48+5:30
कोण कोणाला भेटला, रात्री कुठे बैठक झाली याला काही महत्त्व नसते असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
ठाणे - मी गेल्या ३५ वर्षापासून राजकारणात आहे. ३५ वर्षात दोनदा अशा घटना घडल्यात त्याचा आज मी पहिल्यांदा खुलासा करतो. एकदा मला सकाळी साडे सात वाजता गोपीनाथ मुंडेंचा फोन आला होता. जितेंद्र, तुला आमदार करायचं ठरवलंय, तु तुझ्या बायकोशी बोलून घे आणि मला काय तो निरोप दे, प्रमोदशी(प्रमोद महाजन) माझं बोलणं झालंय, तो संध्याकाळी बाळासाहेबांना भेटून तुझी उमेदवारी फिक्स करेल असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी मला खूप म्हणजे खूपच मदत केलीय. त्यांचे उपकार आहेत. माझ्या बायकोने मुंडेंना फोन केला. तुमच्याबद्दल आदर आहे. तुमचे खूप उपकार आहेत. परंतु तो शरद पवारांना सोडू शकत नाही. हा त्याचा विक पॉईंट आहे असं सांगितले. तेव्हा ठीक आहे काही हरकत नाही. तो टॅलेंटेड आहे. त्याला पटकन संधी देऊन टाकली असती. ती माझ्या हातात आहे असं मुंडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा गोपीनाथ मुंडे मला भेटले ते तेवढ्याच प्रेमाने बोलायचे असं त्यांनी सांगितले.
नजीब मुल्ला कुठेही जाणार नाही
नजीब मुल्ला असा माणूस आहे जो सगळ्यांना वेगवेगळ्या हवेवर घेऊन जातो आणि शेवटी त्याला पाहिजे तिथेच लॅन्ड होतो. त्याने शरद पवारांची भेट घेतली. दोन तीन दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेतली. कालच्या नगरसेवक बैठकीत अजित पवारांनी स्वत: सांगितले. मला नजीबचा फोन आला होता. तो दिल्लीत एका कामानिमित्त आहे. नजीब कुठेही जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेय. कोण कोणाला भेटला, रात्री कुठे बैठक झाली याला काही महत्त्व नसते असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
राज्यभर दौरा करणार
गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचं, इतिहासाचं विद्रुपीकरण सुरू आहे. हा एक कट आहे. सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल उपाहात्मक बोलायचं. तुलना करायची. दर तीन दिवसांनी नवी वाद निर्माण करायचा. त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडतोय. मी, सुषमा अंधारे, संभाजी भगत, वैशाली डोळस आम्ही सर्वजण महाराष्ट्र दौरा करणार आहोत. आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा महाराष्ट्र सन्मान परिषद राज्यभरात फिरणार आहोत अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली.