भाजपचे ‘माफी मांगो’ आंदोलन; बिलावल भुट्टोचा निषेध, मविआ नेत्यांचाही घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:40 AM2022-12-18T06:40:25+5:302022-12-18T06:40:38+5:30
मुंबईतील कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, नालासोपारा, डाेंबिवली भागांत ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंदू-देवदेवता व महापुरुषांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे महाविकास आघाडीचे नेते, तसेच पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी ‘माफी मांगो’ आंदोलन करीत जोरदार निषेध नोंदवण्यात आला.
मुंबईतील कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, नालासोपारा, डाेंबिवली भागांत ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले. संत आणि महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे, खासदार संजय राऊत आणि राष्च्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध करण्यात आला. केळकर चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच, कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या.
...हा तर मविआचा ‘नॅनो मोर्चा’ : देवेंद्र फडणवीस
जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी
संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा ‘नॅनो मोर्चा’ होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावर केली.
निषेधाच्या घोषणा : साताऱ्यात पोवई नाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी झेंडे व बिलावल यांच्या पुतळ्याचे दहन केले. फलटण येथे प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयासमोर पुतळा जाळण्यात आला.
ठाणे, डाेंबिवलीत
कडकडीत बंद
ठाणे : शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे आणि डाेंबिवली बंद पुकारला हाेता. या बंदमुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ, दुकाने उघडली नाहीत. सकाळी स्टेशन परिसरात रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प हाेती. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
पाकचा जळफळाट उघड : बावनकुळे
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली व सामर्थ्यसंपन्न होत आहे. जगाच्या व्यासपीठावार त्यामुळे भारताबद्दल काहीच करता येत नसल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ असून त्यामधून मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली जात आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात आंदोलनाचे नेतृत्व करताना केली.