भाजपचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव

By admin | Published: October 2, 2014 11:18 PM2014-10-02T23:18:45+5:302014-10-02T23:50:00+5:30

उद्धव ठाकरे : मोदी लाट साताऱ्यात का दिसली नाही ?

BJP's Maharashtra punch | भाजपचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव

भाजपचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव

Next

फलटण : ‘महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी व सत्तेच्या स्वार्थापोटी भाजपने युती तोडण्याचे पाप केले आहे. असल्या मतलबी व जनतेला लुबाडणाऱ्या प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीद्वारे ठेचून काढीत भगवा फडकवा,’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, मोदी लाट म्हणणाऱ्यांना साताऱ्यात का लाट दिसली नाही?,’ असा खोचक सवालही यावेळी त्यांनी भाजपला केला. फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या प्रचारार्थ येथील घडसोली मैदानासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिवाकर रावते, डॉ. नंदकुमार तासगावकर, माण-खटावमधील शिवसेनेचे उमेदवार रणजितसिंह देशमुख, वाईचे उमेदवार डी. एम. बावळेकर, कोरेगावचे हणमंतराव चवरे, बारामतीचे राजेंद्र काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे उपस्थित होते. ‘यापूर्वी आपण युतीमध्ये होतो. आता एकटे आहोत. मात्र, निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर सर्वांना भारी आहोत, याचा विसर कोणी पडू देऊ नये. भाजपने सत्तेसाठी सेनेचा वापर करून घेतला. त्यांच्या सत्ता स्थापण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. आता शिवसेनेला संपवायला केंद्रीय मंत्रिमंडळ राज्यात प्रचाराच्या निमित्ताने आदळणार आहे. याप्रसंगी शिवसैनिकांनी ताकद निवडणुकीद्वारे दाखवून द्यावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.
‘आजपर्यंत दादा-बाबांच्या टोळीने जनतेला लुबाडले. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखरसम्राट आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना संपविण्याचे काम केले आहे. त्यांना काँग्रेसवाल्यांनी साथ देत जनतेला पाणी व विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. आमचे सरकार १९९५ साली सत्तेत असताना आम्ही झोनबंदी उठविली. आता
सत्तेत आल्यावर दोन कारखान्यांमधील अंतर उठविण्याबरोबरच रंगराजन समितीच्या शिफारशीही राबविणार आहोत,’ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


कारखाना उभारणीत सत्ताधाऱ्यांचा अडथळा
यावेळी डॉ. नंदकुमार तासगावकर म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी मी फलटण तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी साखर कारखाना उभारण्याचा
प्रयत्न केला. मात्र, इथल्या सत्ताधारी मंडळींनी त्यामध्ये अडथळे आणले. आर्थिक नुकसान केले. मात्र, तरीसुद्धा आपण येथे कारखाना उभारून प्रत्येकाच्या हाताला काम देणार आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवा.’

Web Title: BJP's Maharashtra punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.