भाजपाची सभा सोमय्या मैदानावर
By admin | Published: February 13, 2017 04:10 AM2017-02-13T04:10:49+5:302017-02-13T04:10:49+5:30
मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभेवरून शिवसेना आणि भाजपातील तिढा निकाली निघाला आहे. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिवसेनेची, तर...
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभेवरून शिवसेना आणि भाजपातील तिढा निकाली निघाला आहे. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिवसेनेची, तर चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर भाजपाची सभा होणार आहे.
बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावरील १८ फेब्रुवारीच्या शिवसेनेच्या सभेसाठी सर्व प्रक्रिया पार पाडूनही अडथळे आणले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप शिवसेनेने शनिवारी केला होता. यावर मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी रविवारी भाजपा शेवटची प्रचारसभा सोमय्या मैदानावर घेणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या मुद्द्यावरून शिवसेनेने केलेल्या आरोपांचा त्यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘बीकेसीमधील मैदान कुणाला मिळणार, याबद्दल सेना नेते थयथयाट करत आहेत. बीकेसी येथील सभेसाठी भाजपाने ११ जानेवारी रोजी एमएमआरडीएला पत्र दिले होते, तसेच २४ जानेवारीला मैदानाशेजारील वाहनतळाच्या जागेची मागणी केली होती. त्या दोन्ही परवानग्या आमच्याकडे आहेत. या प्रकरणी शिवसेना जरी चिल्लरपणा दाखवत असली, तरी सध्या आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने त्यांचा बालहट्ट पुरविणार आहोत. त्यामुळे आम्ही सोमय्या मैदानावर सभा घेऊ,’ असे शेलार यांनी स्पष्ट केले.
‘शिवसेनेने आताच पराभव पत्करला आहे. त्यांच्या वागणुकीतून त्यांची पराभूत मनोवृत्ती दिसत आहे. स्वत:ला राज्याचा नेता म्हणवणारे उद्धव ठाकरे हे मुलुंडची सीमा ओलांडून बाहेर पडले नाहीत. उद्धव ठाकरे मुंबई सोडून बाहेर प्रचाराला जायला तयारच नाहीत. ठाणे, पुणे, नाशिक, अकोला कुठेही जाण्याची त्यांची हिंमतच नाही. हा आमचा एकप्रकारे विजयच आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री विदर्भपासून मुंबईपर्यंत धडाक्यात प्रचार करत आहेत,’ असेही शेलार म्हणाले. (प्रतिनिधी)