‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:21 AM2020-01-18T05:21:39+5:302020-01-18T05:21:56+5:30
मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती.
पिंपरी : भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यासाठी विविध राजकीय पक्षांतून आयारामांना संधी दिली. त्यामुळे नुकसान झाल्याची उपरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आता झाली आहे. आकुर्डीतील पक्षाच्या बैठकीत भाजपात मेगा भरती ही मेगा चूक होती, अशी कबुली पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन वर्षांच्या सत्तेच्या काळात भाजपावर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले आहेत. यामुळे पक्षाची प्रतिमा डागळली जात असल्याबाबत पाटील यांनी आकुर्डीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. त्यांनी नगरसेवकांना कारभाराबाबत कानपिचक्या दिल्या व पक्षसंघटना आणि बदललेल्या धोरणांबाबत मनातील खदखद बोलून
दाखविली.
पाटील म्हणाले, हा माझा, हा तुझा यामुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाले आहे. ‘दिल के नजदीक है’ याला महत्त्व नसून ‘पार्टी के नजदिक है’ याला महत्त्व द्यायला हवे. मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती.
बाहेरच्यांना संधी मिळाली, पण पक्षातील कार्यकर्त्यांना नाही. पक्षातील ही संस्कृती बदलण्याची गरज आहे.