भाजपाची जमवाजमव सुरू

By admin | Published: October 8, 2016 01:08 AM2016-10-08T01:08:25+5:302016-10-08T01:08:25+5:30

प्रभाग फेररचना आणि आरक्षण पथ्यावर पडल्यामुळे भाजपाच्या मिशन १०० ला आणखी बळ मिळाले आहे़

BJP's mobilization has started | भाजपाची जमवाजमव सुरू

भाजपाची जमवाजमव सुरू

Next

शेफाली परब,

मुंबई - प्रभाग फेररचना आणि आरक्षण पथ्यावर पडल्यामुळे भाजपाच्या मिशन १०० ला आणखी बळ मिळाले आहे़ त्यामुळे पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी जिंकून येणाऱ्या उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे़ पण तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांची कुमक पक्षात तशी कमी असल्याने भाजपाने इतर पक्षांमध्ये गळ टाकण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार मनसेनंतर आता काँग्रेसमधील नाराजांना फोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ या गळाला काँग्रेसमधील कामत गट लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़
मोदी फॅक्टरने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फायदा करून दिला़ त्यामुळे पारडे जड असलेल्या भाजपाला मित्रपक्ष शिवसेनेबरोबर युती करण्यात स्वारस्य नाही़ सत्तेसाठी या युतीचा विचार वरिष्ठ पातळीवर होत असला तरी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यासाठी इच्छुक नाहीत़ त्यामुळे ‘एकला चालो रे’ची हाक भाजपातील नेते स्वतंत्रपणे देत आहेत़ तत्पूर्वी पालिका निवडणुकीत १०० जागा निवडून आणण्यासाठी चाचपणी करण्यात आली़ मात्र सध्या या पक्षाला अच्छे दिन असले तरी आतापर्यंत भाजपाची ३० पर्यंतच मजल गेली आहे़
त्यामुळे विजयाचा हा अश्वमेध दौडत राहण्यासाठी भाजपाची सध्या ‘मिशन शोधाशोध’ सुरू आहे़ गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला हादरा देत २९ जागा निवडून आणणाऱ्या मनसेला सर्वप्रथम भाजपाने गळ टाकला होता़ यात प्रकाश दरेकर, सुजाता पवार असे काही नगरसेवक भाजपात गेले़ मात्र सर्व जागांवर निवडणूक लढवायची झाल्यास कार्यकर्ते आणि ताकदीचे उमेदवार लागणार असल्याने भाजपाने इतर पक्षांतही चाचपणी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते़
>कामत गट गळाला लागण्याची शक्यता
आपल्या मर्जीतील माणसाला तिकीट मिळवून देण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये निवडणुकीच्या काळात रस्सीखेच सुरू होते़ या अंतर्गत राजकारणात काहींचे बळीही जातात़ अशा वेळी अनेक जण मिळेल ती संधी घेऊन बाहेर पडतो़ सध्या काँग्रेसमध्ये वादग्रस्त विधान करून मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम अडचणीत आले आहेत़ त्यामुळे त्यांचे उरलेसुरलेले समर्थकही संभ्रमात आहेत. तर कामत गटातील नगरसेवकांचे पत्ते साफ करण्यात येत असल्याने त्यांच्यातही कुरबूर सुरू आहे़ त्यामुळे या गटापर्यंत पोहोचण्याच्या हालचाली सुरू आहेत़
हे लागले गळाला : माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई हे काँग्रेसचे आघाडीचे नगरसेवक होते़ भविष्यात ते विरोधी पक्षनेते होतील, असा अंदाज होता़ परंतु गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता़ त्यांना भाजपातून उत्तम संधी असल्याने त्यांनी याआधीच भाजपात प्रवेश केला आहे़ तर आमदार रमेश ठाकूर यांचे पुत्र व नगरसेवक सागरसिंह ठाकूर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला़
>यांना बसला फेररचनेचा फटका
माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांची गेल्या वर्षी विरोधी पक्षनेते पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली़ ते कामत समर्थक म्हणून ओळखले जातात़ फेररचनेत त्यांचा प्रभाग गायब झाला आहे, तर अंधेरीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मोहसीन हैदर यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे़ ते आपल्या पत्नीला तिकीट मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचे समजते़ काँग्रेसच्या शीतल म्हात्रे या विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक होत्या़ मात्र त्यांना डावलण्यात आले होते़ तर भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नगरसेवक स्वगृही परतण्याची चर्चा भाजपा गोटातच रंगत
आहे़ मात्र या नेत्याकडून त्या वृत्ताचा इन्कार केला जात आहे़ तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचा मोठा गट भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली.

Web Title: BJP's mobilization has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.