छोट्या मित्रांकडून भाजपाची कोंडी
By admin | Published: January 21, 2017 03:58 AM2017-01-21T03:58:20+5:302017-01-21T03:58:20+5:30
गोंधळाची स्थिती असतानाच भाजपाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (रिपाइं) व शिवसंग्राम या दोन मित्रपक्षांनी कोंडीत पकडले आहे
अजित मांडके,
ठाणे- महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होणार किंवा कसे, याबाबत गोंधळाची स्थिती असतानाच भाजपाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (रिपाइं) व शिवसंग्राम या दोन मित्रपक्षांनी कोंडीत पकडले आहे. रिपाइं आठवले गटाने तब्बल २० जागांची, तर शिवसंग्रामने १६ जागांची भाजपाकडे मागणी केली आहे. या मित्रपक्षांच्या ३६ जागांच्या मागणीखेरीज वेगवेगळ्या पक्षांतून भाजपात आलेल्या उपऱ्यांची वर्णी लावल्यावर निष्ठावंतांपुढे किती जागांचा तुकडा भिरकवायचा, असा गंभीर पेच भाजपापुढे निर्माण झाला आहे. भाजपावर जास्तीतजास्त जागांकरिता दबाव वाढवण्याकरिता रिपाइं व शिवसंग्राम या पक्षांना शिवसेनेने फूस लावल्याची दबक्या आवाजातील चर्चा भाजपाच्या वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना, भाजपा, रिपाइं, शिवसंग्राम, रासपा यांचे गळ्यात गळे होते. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यावर रिपाइंचे रामदास आठवले व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आठवले यांची केंद्रातील मंत्रीपदाची आस भाजपाने पूर्ण केली. आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपासोबत आलेल्या मेटे यांना भाजपाने आमदारकी बहाल केली. मात्र, रासपाच्या महादेव जानकर यांना मंत्रीपद देताना मेटे यांना शिवस्मारक समितीच्या प्रमुखपदावर समाधान मानावे लागले. यामुळे ते नाराज असतानाच शिवस्मारकाच्या जलपूजन, भूमिपूजनात डावलल्याने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा केली. या पार्श्वभूमीवर ठाण्यात या दोन्ही मित्रपक्षांनी भाजपाकडे तब्बल ३६ जागांची मागणी केली आहे.
ठाण्यात शिवसेनेच्या फॉर्म्युलानुसार भाजपाला ते ४५ ते ५० जागा सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. याखेरीज, रिपाइंसाठी पाच जागा सोडण्यास सेना तयार आहे. परंतु, भाजपाला स्वत:लाच ६७ जागा हव्या असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे युती झाली, तर मित्रपक्ष व बाहेरून घेतलेले इच्छुक आणि पक्षाचे निष्ठावंत या साऱ्यांना खूश करणे भाजपाला अशक्य होणार आहे. ‘शिवसंग्राम’चे ठाण्यात फारसे अस्तित्व नाही. परंतु, असे असले तरी मित्रावर दबाव वाढवण्याकरिता त्यांनी १६ जागांची मागणी रेटली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, १५, २२ याकरिता आग्रह धरल्याची माहिती ‘शिवसंग्राम’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आम्ही सत्तेतील मित्रपक्ष असल्याने ठाण्यातही त्यांच्या बरोबरीने लढण्यासाठी सज्ज आहोत. आमची ज्या प्रभागांत ताकद आहे, त्या ठिकाणच्या जागा मागितल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
रिपाइं (आठवले ) गटाने भाजपाकडे २० जागांची मागणी केली आहे. मागील निवडणुकीतील जागांपेक्षा यंदा पक्षाने १० जास्त जागांची मागणी केली आहे. शिवसेनेने त्यांना केवळ पाच जागा देण्याची तयारी दाखवल्याने रिपाइंने आपला मोर्चा भाजपाकडे वळवल्याचे बोलले जात आहे.
।आम्ही भाजपाकडे १६ जागांची मागणी केली असून त्यासंदर्भातील पत्र भाजपाकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडून आमचा योग्य सन्मान होईल, अशी आशा आहे. - रमेश आंब्रे,
शिवसंग्राम संघटना, ठाणे शहराध्यक्ष
।मागील निवडणुकीत आम्ही १० जागांवर लढलो होतो. त्यामुळे आता किमान २० जागा आम्हाला मिळाव्यात, ही आमची इच्छा आहे. - रामभाऊ तायडे,
ठाणे शहराध्यक्ष रिपांइ, आठवले गट
।मित्रपक्षाकडून जागांची मागणी झाली आहे. परंतु, त्यांचा पक्षाकडून योग्य तो सन्मान केला जाईल. - संदीप लेले,
अध्यक्ष ठाणे शहर, भाजपा
>भाजपातच ६०० जण इच्छुक
भाजपाकडून तब्बल ६०० जण इच्छुक आहेत. त्यात मागील काही दिवसांत इतर पक्षांतून आलेल्यांचा समावेश आहे. रिपाइं व शिवसंग्राम यांना भाजपा मोजक्या जागा देणार असला, तरी शिवसेनेने त्यांना फूस लावल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.भाजपाकडे असलेला एखादा छोटा पक्ष जरी शिवसेनेसोबत गेला, तरी भाजपाला मित्र सांभाळता येत नाही, असा कांगावा करण्याची संधी सेनेला मिळणार आहे.