नगर जिल्ह्यातील पक्षाचं नुकसान भरून काढण्यासाठी भाजपची शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 02:01 PM2020-01-11T14:01:43+5:302020-01-11T14:03:07+5:30
अहमदनगरमध्ये पक्षाचं झालेलं नुकसान कमी करण्यासाठी भाजप कार्यकारणींने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - विखे पाटील पिता-पुत्र, पिचड पिता-पुत्र यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात घेऊन पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही. किंबहुना पक्षाला अहमदनगर जिल्ह्यात नुकसान सहन करावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने नवीन शक्कल काढली आहे.
तत्कालीन काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षाला फायदा होईल या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये घेतले. तर मधुकर पिचड यांना देखील आमदार पुत्रासह भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र यातून काही साध्य झालं नाही. जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या 7 व्हायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात ही संख्या तीनवर आली. यात भाजपचं मोठं नुकसान झालं.
दरम्यान अहमदनगरमध्ये पक्षाचं झालेलं नुकसान कमी करण्यासाठी भाजप कार्यकारणींने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा भाजपमध्ये दोन जिल्हाध्यक्ष देण्याचं नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शहर आणि ग्रामीणसाठी असे दोन जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षांची निवड प्रदेश पातळीवर घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येते.