भाजपाचे आता नारायणास्त्र!, शिवसेनेची कोंडी होणार?

By अतुल कुलकर्णी | Published: October 3, 2017 04:35 AM2017-10-03T04:35:44+5:302017-10-03T04:36:07+5:30

सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यावर अक्सीर इलाज म्हणून आता भाजपाकडून ‘नारायण’अस्त्राचा वापर केला जाणार आहे.

BJP's now Narayanastra, Shiv Sena will be stopping? | भाजपाचे आता नारायणास्त्र!, शिवसेनेची कोंडी होणार?

भाजपाचे आता नारायणास्त्र!, शिवसेनेची कोंडी होणार?

Next

मुंबई : सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यावर अक्सीर इलाज म्हणून आता भाजपाकडून ‘नारायण’अस्त्राचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला ठोकून काढायचे आणि सेना सत्तेतून स्वत:हून बाहेर पडण्याइतपत वातावरण तयार करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत.
सत्तेत राहून शिवसेना सतत सरकारवर टीका करत आली आहे. आता राणेंचा स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सहभागी होईल व तो शिवसेनेवर सतत टीका करत राहील. सत्तेत राहून सेना भाजपावर टीका करते, मग राणेही सत्तेत राहून शिवसेनेवर टीका करतील. आम्ही शिवसेनेला कधीही सरकारवर टीका करू नका, असे सांगितलेले नाही. मग राणेंच्या पक्षाला तरी कसे सांगावे, असे उत्तर एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने दिले आहे. प्रत्येक पक्षाची स्वत:ची राजकीय भूमिका असते, त्यानुसार ते वागतात. त्यांना कसे अडवायचे, असा सवालही त्या नेत्याने केला.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर राष्टÑवादी भाजपाला पाठिंबा देणार का? आणि दिला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो घेणार का? असा पेच तयार झाला होता. त्या वेळी आपला पक्ष नेमके काय करणार आहे? असे काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना दोन महिन्यांपूर्वी विचारले होते. तेव्हा सप्टेंबरनंतर आपण भूमिका स्पष्ट करू, असे पवारांनी सांगितले होते. मंगळवारी पवार पक्ष कार्यकारिणीची
बैठक मुंबईत घेणार आहेत. दुपारी पत्रकार परिषदही त्यांनी बोलावली आहे. याचा अर्थ पवारांनी त्या वेळी दिलेला मुहूर्त जवळ आला असावा, असे मत राष्टÑवादीच्या नेत्याने व्यक्त केले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राणे यांना पुढे करून काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना या तीनही पक्षांतून मतदारसंघांची गणिते जुळवत, भाजपाला त्रास न होता जे आमदार राणे यांच्या पक्षात येतील, त्यांची तेथे सोय लावली जाईल. राणेंच्या रूपाने भाजपाला ताकद देणारा वेगळा गट उभा करण्याची ही रणनीती आता आकाराला येत आहे.

शिवसेना भाजपावर टीका करू लागली की राणे शिवसेनेवर प्रहार करतील. शिवसेनेवर टोकाची टीका करण्याचे काम राणे यांनी पहिल्या दिवसापासून सुरू केले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली नाही, तर ती सत्तेसाठी लाचार आहे, असेही मांडले जाईल.परिणामी, शिवसेनेची अवस्था इकडे आड तिकडे विहीर केली जाईल. दिवाळी जवळ आली असली तरी फटाके आत्ताच फुटायला सुरुवात झाल्याचेही एका नेत्याने बोलून दाखवले.

Web Title: BJP's now Narayanastra, Shiv Sena will be stopping?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.