भाजपाची मनसेला ऑफर, राज ठाकरेंचं सूचक विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 03:14 PM2023-08-14T15:14:25+5:302023-08-14T15:30:46+5:30
राज्यात राजकीय घोळ झालाय त्यामुळे महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही असंही राज यांनी सांगितले.
मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. याच बैठकीत राज ठाकरे यांनी युतीवर भाष्य केले. भाजपाकडून युतीची ऑफर मिळाली आहे पण अद्याप आपण कुठलाही निर्णय घेतला नाही असं राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.
मनसेच्या बैठकीत लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यात लोकसभा निहाय मतदारसंघात मनसेची टीम जाणार, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार त्यानंतर पुढील कार्यक्रम हाती घेणार असल्याचे बैठकीत ठरले. मनसे-भाजपा-शिंदे गटासोबत युतीत जाणार अशी चर्चा मागील वर्षभरापासून सुरू आहे. त्यावरही राज ठाकरेंनी यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सांगितले. भाजपाकडून आपल्याला ऑफर आहे परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार यांचे भाजपा काय करणार, पुढचे गणित कसे जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही. युतीबाबत तुम्ही चर्चा करू नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्त्वाचे आहे असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
राज ठाकरेंचं सूचक विधान
मध्यंतरी मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरू होत्या, मनसेची एकला चलो रे ची भूमिका आहे का असा प्रश्न पत्रकारांनी बैठकीनंतर राज ठाकरेंना विचारला होता. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, काय वदवून घ्यायचंय? परिस्थितीनुसार गोष्टी घडतात. आता तुम्हाला सवयही झालीय. दोन दिवसांपूर्वी काय बोलले जाते आणि दोन दिवसानंतर काय घडते आता हे पत्रकारांना नवीन नाही. परंतु महाराष्ट्राची प्रताडणा जास्तीत जास्त होणार नाही याची काळजी आमच्याकडून घेतली जाईल. जी घेत होतो ती यापुढेही घेतली जाईल असं सूचक विधान त्यांनी केले.
महापालिका निवडणुका लागतील वाटत नाही
यावर्षी महापालिका लागतील असं वातावरण दिसत नाही. राज्यात राजकीय घोळ झालाय त्यामुळे महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील. आम्ही प्रत्येक मतदारसंघनिहाय टीम पाठवू आणि आढावा घेतला जाईल. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यादृष्टीने आजची बैठक होती. पनवेलला माझा मेळावा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जे खड्डे पडलेत त्यावर मी बोलणार आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.