भाजपाची वाटचाल अध्यक्षीय राजवटीकडे
By admin | Published: July 5, 2017 04:22 AM2017-07-05T04:22:08+5:302017-07-05T04:22:08+5:30
‘सातत्याने नवीन अध्यादेश काढून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘सातत्याने नवीन अध्यादेश काढून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर ग्रामपंचायतींचे सरपंचही थेट जनतेतून निवडण्याचा डाव खेळणाऱ्या भाजपाची वाटचाल अध्यक्षीय राजवटीकडे सुरू आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंगळवारी साताऱ्यात आले होते.
सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना पवार म्हणाले, ‘नगरपालिका व ग्रामपंचायतींमध्ये भाजपला बहुमत मिळत नाही, म्हणून अध्यक्ष व सरपंच निवडी थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिगटाने घेतलेल्या या निर्णयामुळे गावागावात वादाची ठिणगी पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत एका बाजूला तर नगराध्यक्ष व अथवा सरपंच एका बाजूला, अशी स्थिती निर्माण होईल. सरपंचाने एखादा ठराव मांडला तर त्याला बहुमतातील विरोधकांकडून निश्चितपणे विरोध होईल. साहजिकच राजकीय वादावादीमुळे गावांचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबत सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत.’ परदेशातील काळा पैसा आणणार, १५ लाख रुपये लोकांच्या खात्यांत जमा करणार, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी, शेती उत्पादनाला आधारभूत किंमत, नोकऱ्या उपलब्ध करणार, उद्योग क्षेत्र वाढविणार अशा घोषणा मोदींनी निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. मात्र, एकही घोषणा सत्यात उतरलेली नाही.
धोतर-लुगडीही महाग़़़
निवडणुकीत केलेल्या घोषणा मोदी सरकारने पूर्ण केल्या नाहीत़ जीएसटी लागू करून सर्वसामान्यांचे धोतर-लुगडीही सरकारने महाग केली, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.