"मी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते", शरद पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 06:50 PM2023-05-07T18:50:03+5:302023-05-07T18:51:14+5:30
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
पंढरपूर : महाराष्ट्रात येत्या दहा तारखेला आपण मुंबईत गेल्यावर तिन्ही पक्षांशी बोलून महाविकास आघाडी म्हणून पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. राज्यातील लोकांना बदल पाहिजे आहे. विरोधी पक्षांची एकजूट व्हावी. हीच आमची इच्छा आहे. मी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते, असा टोला शरद पवारांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच विठ्ठल कारखान्यावर सीएनजी प्रकल्प उभारला जातो आहे. या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या शेतकरी मेळाव्यास शरद पवारांनी संबोधित केले. शरद पवार यांच्या निवृत्ती मागे घेण्याच्या निर्णयानंतर या आठवड्यातील शरद पवार यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम पंढरपूर येथे झाला. यावेळी आमदार रोहित पवार कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, डॉ. बी.पी. रोंगे , आमदार संदीप क्षीरसागर, खा. ओमराजे निंबाळकर, आ. यशवंत माने, आ. संजयमामा शिंदे , राजन पाटील हे उपस्थित होते.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेतील असे आपल्याला वाटते. एकंदर देशातील राज्याचा विचार केला तर सध्या पाच ते सहा राज्यात केवळ भाजप आहे उर्वरित राज्यांमध्ये भाजप नाही. काँग्रेस फोडून सत्ता आणली गेली आहे. त्यामुळे कर्नाटकात पूर्ण बहुमतात काँग्रेस येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच, कर्नाटक सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला इतर पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र फडणवीस यांनी विरोध केला. त्यामुळे मराठी माणूस बेळगावला अत्याचार सहन करतो आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचा पंचा घालून त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पवारांच्या समोरच अभिजीत पाटील यांचे दरेकरांसोबत अर्थात भाजपशी चांगले संबंध आहेत आणि ते पवारांशी सुद्धा संबंध राखून आहेत, अशी टिप्पणी करत त्यांना थेट पक्षात घेण्याची विनंती शरद पवार यांना केली. त्यानंतर शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा साठी अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याच्या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.