एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं, पण...; शिवसेनेने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 09:35 AM2022-07-23T09:35:27+5:302022-07-23T09:35:53+5:30
ही भाजपाची स्क्रिप्ट आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करून शिवसेना संपवण्याचा डाव आहे असं शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान म्हणाले.
मुंबई - वर्षावर एकनाथ शिंदे यांना बोलावलं, मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं असेल तर मी पायउतार होतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. या घटनेला आदित्य ठाकरे साक्षीदार होते. शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती. आमदारांना माझ्यासमोर आणा, आपण चर्चेतून मार्ग काढू असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंना कळवलं परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदारांनी सूरत, गुवाहाटी गोवा प्रवास सुरू केला असा खुलासा शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केला आहे.
हर्षल प्रधान म्हणाले की, मुख्यमंत्रिपदावर असलेल्या माणसाला प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या हालचालीची माहिती असते. अख्खं पोलीस विभाग ही माहिती पुरवत असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना काय प्रॉब्लेम आहे? असं विचारलं. तर आमदारांना भाजपासोबत जायचं आहे असं ते म्हणाले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी ज्यांना भाजपासोबत जायचं आहे त्यांना माझ्यासमोर आणा, मी सगळ्यांशी बोलतो. त्यावर चर्चा करून मार्ग काढू असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं. तेव्हा ठीक आहे मी घेऊन येतो असं शिंदेंनी म्हटलं परंतु त्यानंतर त्यांनी आमदारांना घेऊन सूरत, गुवाहाटी गाठलं असं त्यांनी सांगितले. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच भाजपाला शिवसेना संपवायची आहे. ही भाजपाची स्क्रिप्ट आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करून शिवसेना संपवण्याचा डाव आहे. यामुळे शिवसेना कमकुवत झाली नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकद कमकुवत झाली. शिवसेनेचं नुकसान काय झालं? ज्या माणसाला सामान्य माणूस ते आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं हे कुणामुळे झालं? शिवसैनिक असल्यामुळेच त्यांना हे मिळालं. स्वत:च्या आजारपणाकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले नाही. शिवसेना हेच माझं कुटुंब आहे याचदृष्टीने काम करतात. शिवसैनिक आजही काम करतोय, आजही शिवसेना भवनात मराठी माणूस, हिंदू माणूस, मुस्लीम माणूस त्यांचे काम घेऊन येतोय असं प्रधान यांनी म्हटलं.
दरम्यान, सत्ता मिळत नव्हती म्हणून उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता भाजपानं ओरबडून घेतली. राज्यावर ६ लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षाच्या पूर्ण कालावधीत देशातला नंबर वन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा गौरव केला हे काहींना पाहावलं नाही. नेमकं काय चुकलं? या अवस्थेत महाराष्ट्र उभा आहे. बंडखोरांना काय देण्यात कमी पडलं? शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे. ज्यांना शिवसेना माहिती नाही ते आता बोलत आहे. सुहास कांदेला ओळख शिवसेनेने दिली. भुजबळ पालकमंत्री असताना सुहास कांदे यांनी त्यांच्याविरोधात काम केले. निधी हा जनतेचा असतो. स्वत:चा नसतो असा टोला हर्षल प्रधान यांनी लगावला आहे.
सत्तेच्या लोभापायी आमदार गेले
लोकांचा विश्वास जिंका असं बाळासाहेब नेहमी म्हणायचे. बाळासाहेबांच्या आग्रहास्तव मी शिवसेनेत आलो. माझी निष्ठावंत अशी ओळख आहे, जीवनात यापेक्षा आणखी काय हवं? बंडखोर आमदार शिवसेनेला सोडून गेले नाहीत, बाळासाहेबांना सोडलं नाही तर त्यांना फसवलं गेले आहे. भाजपाचा डाव शिवसेना संपवण्याचा आहे. शिवसेना संपवण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय. सत्तेचा लोभ असणारी माणसं तिकडे गेली अशा शब्दात हर्षल प्रधान यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.