ठाकरे-पवारांना शह देण्याचा भाजपाचा डाव; मुंबई, बारामतीचा गड काबीज करण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 10:44 AM2022-09-06T10:44:07+5:302022-09-06T10:44:54+5:30
अमित शाह यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं शहरात येत 'मिशन मुंबई'चा श्रीगणेशा करत शिवसेनेला जमीन दाखवा असं आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन बारामती हाती घेतले आहे.
मुंबई - महाराष्ट्रात ठाकरे-पवार यांच्या महाविकास आघाडीला धोबीपछाड देऊन सत्तांतर घडवल्यानंतर आता भाजपानं मुंबई, बारामतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन दिवसाच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात सोमवारी उद्धव ठाकरेंवर शाह यांनी जोरदार निशाणा साधला. तर आता भाजपानं पवारांच्या बारामतीला टार्गेट केले आहे. गेल्या ५ दशकापासून बारामतीत राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्याठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी वरिष्ठ नेते कामाला लागलेत.
अमित शाह यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं शहरात येत 'मिशन मुंबई'चा श्रीगणेशा करत शिवसेनेला जमीन दाखवा असं आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन बारामती हाती घेतले आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या दृष्टीने भाजपानं जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३ दिवस बारामतीत तळ ठोकून असणार आहेत. त्यामुळे ठाकरेंसोबतच पवारांना टार्गेट करण्यासाठी भाजपा सज्ज आहे.
याबाबत भाजपा नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. निवडणुका येतील तेव्हा ते वेगळं वातावरण असेल. सध्या पक्ष संघटना बळकट करण्यासाठी दौरे सुरु आहेत. अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देत पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. निर्मला सीतारामन यांची नेमणूक बारामती लोकसभा प्रभारीपदी करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले.
तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरातील १४० मतदारसंघात भाजपा पिछाडीवर होती. या मतदारसंघात विशेष लक्ष देण्याचं पक्षनेतृत्वानं ठरवलं आहे. त्यामुळे २२, २३ आणि २४ तारखेला निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात बारामतीतील ६ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. २१ मुद्द्यांवर या ३ दिवसांत चर्चा होणार आहे. केंद्रानं ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार सगळी रुपरेषा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी खूप वेळ आहे. त्यामुळे अद्याप उमेदवार कोण याची चर्चा नाही. भाजपाची ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांना बळ देणे, पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जाणे हे काम सुरु आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.