भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 08:11 PM2024-11-25T20:11:14+5:302024-11-25T20:11:47+5:30
संघ प्रचारक ते भाजपचे राष्ट्रीय सहसंघटना सरचिटणीस; कोण आहेत शिव प्रकाश? जाणून घ्या...
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने पहिल्यांदाच 235+ जागा जिंकून इतिहास रचला. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीला 50 चा आकडाही पार करता आला नाही. महायुतीच्या ऐतिहासिक विजयामागे अनेक नेत्यांचा हातभार लागला आहे. पण, यात भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश (ShivPrakash) यांचा सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्रापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत शिवप्रकाश यांनी भाजपला आश्चर्यकारक विजय मिळवून दिलेला आहे.
2017 मध्ये उत्तराखंड आणि 2023 मध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय अवघड मानला जात होता. त्यावेळी शिवप्रकाश यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनी आपली मायक्रो प्लानिंगने भाजपच्या विजयाची रणनीती आखली आणि या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आणली. विशेष म्हणजे, 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीतही शिवप्रकाश यांच्या रणनीतीने भाजपला पुन्हा सत्तेत आणले.
संकल्प पूर्ति पर आनंद की अनुभूति ।
— Shivprakash (@shivprakashbjp) November 23, 2024
धन्यवाद महाराष्ट्र ।@BJP4Maharashtrapic.twitter.com/J4yHUDjQeW
निवडणुकीची कशी तयार केली रणनीती
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते. मराठा आरक्षण, जात जनगणना आणि संविधानाच्या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीसमोर भाजपचा निभाव लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, शिवप्रकाश यांनी जून ते नोव्हेंबरदरम्यान, महाराष्ट्रात संघटना मजबूत केली. त्यांनी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन केले, त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यामुळेच पक्ष आपल्यावर विश्वास ठेवून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देत असल्याचा संदेश सर्व कार्यकर्त्यांना गेला. याच भावनेने कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जीव ओतून काम केले. भाजपचे मूळ मतदार जे लोकसभा निवडणुकीत मतदानात फारसे सक्रिय नव्हते, त्यांना भाजपने पुन्हा सक्रिय केले.
बड्या नेत्यांना जबाबदारी दिली
शिवप्रकाश यांनी बूथची अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींमध्ये विभागणी केली, त्यापैकी ब आणि क बूथवर अधिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यांनी बूथ जिंकण्यासाठी जास्त प्रयत्न केले. तसेच, सर्व विधानसभेतील नाराज लोकांची आणि प्रभावशाली लोकांची यादी बनवली आणि त्यांच्याशी संपर्क साधून भाजपकडे ओढले. सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात आले. या सर्व रणनीतीमुळे भाजपला एवढा मोठा विजय मिळवता आला.
कोण आहेत शिवप्रकाश?
शिवप्रकाश मूळ मुरादाबादचे आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते संघाचे प्रचारक होते. आपल्या मायक्रो प्लानिंगमुळे त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे. शिवप्रकाश यांना राजकीय समज आणि नाराज नेते किंवा कार्यकर्त्यांची समजून काढण्यातील तज्ञ मानले जाते. महाराष्ट्रात असताना तिकीट वाटपानंतर नाराज झालेल्या नेत्यांची मनधरणी करून त्यांच्या शंका दूर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.