‘एमएमआरडीए’वर भाजपाचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: October 11, 2015 04:45 AM2015-10-11T04:45:38+5:302015-10-11T04:45:38+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ आणि ७ या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ आणि ७ या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी ५.३0 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असून, या भूमिपूजन समारंभानिमित्त भाजपाने मुंबईत भव्य शक्तिप्रदर्शन आयोजित केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमासाठी भव्य स्टेजसह जय्यत तयारी केली असून, याचा खर्च एमएमआरडीएने केला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मंजुरी मिळालेल्या दहिसर ते डी.एन. नगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम ४ आॅक्टोबर रोजी होणार होता. अखेर ११ आॅक्टोबरला या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएने जय्यत तयारी केली असून, एमएमआरडीए मैदानात याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भूमिपूजन सोहळ्याचे रूपांतर भाजपाच्या सभेत होणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मेट्रो भूमिपूजनानंतर होणाऱ्या सभेसाठी मुंबई भाजपाने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक आमदार आणि खासदाराने सभेला उपस्थित राहण्यासाठी आपल्या मतदारसंघात बॅनरबाजी केली आहे; तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्यालाही या सभेला गर्दी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे एमएमआरडीए मैदानावर रविवारी भाजपाचे शक्तिप्रदर्शन पाहण्यास मिळणार आहे. एमएमआरडीएच्या मैदानावर राजकीय सभांसाठी शुल्क आकारण्यात येते. परंतु मेट्रोचा कार्यक्रम या मैदानावर आयोजित करत भाजपाने प्राधिकरणाच्या पैशातून स्वत:चे शक्तिप्रदर्शन घडवून आणल्याची चर्चा रंगली आहे. (प्रतिनिधी)