संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
By यदू जोशी | Published: October 17, 2024 07:12 AM2024-10-17T07:12:30+5:302024-10-17T07:13:57+5:30
देवेंद्र फडणवीसांकडून ‘समजूत अभियान’, दगाफटका नको म्हणून सावध भूमिका
यदु जोशी -
मुंबई : विधानसभेच्या तिकीट वाटपानंतर होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी तीन आघाड्यांवर काम केले जात आहे. बंडखोरीचा फटका पक्षाला आणि मित्रपक्षांनाही बसू नये याची काळजी घेतली जात आहे. रा.स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.
जिथे नाराजी होऊ शकते असे ५२ मतदारसंघ भाजपने काढले आहेत. तिथे नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घेतली जात आहे. भाजपच्या वाट्याला येणार असलेल्या ज्या मतदारसंघांमध्ये दोन किंवा तीन प्रबळ दावेदार आहेत, त्यांच्यापैकी ज्याला तिकीट नाकारण्याचे ठरले आहे त्यांना त्या भागातील भाजपचे बडे नेते, संघाचे पदाधिकारी नीट समजावून सांगत आहेत. ज्यांचे तिकीट पक्के झाले त्यांना तसे सांगण्यात येत आहे. काही नेत्यांना समजावून सांगणे संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कठीण जाते, अशांना मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलावून घेत आहेत. सागर बंगल्यावर चार दिवसांपासून फडणवीस यांनी ‘समजूत अभियान’ हाती घेतले आहे.
जिथे गडबड होऊ शकते, त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष
दोनतीन प्रबळ दावेदारांपैकी एकाला तिकीट दिल्यानंतर इतर दोघांची समजूत काढणे, विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार आहे तिथे त्या आमदाराला शांत करणे यावर काम केले जात आहे. काही अगदी बोटावर मोजण्याइतके असे मतदारसंघ आहेत की जे २०१९ च्या वा आधीच्या निवडणुकीत भाजपकडे होते, पण आता युतीधर्म पाळण्यासाठी ते शिंदेसेना वा अजित पवार गटाला द्यावे लागत आहेत.
अशा ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते. ती होऊ नये आणि मित्रपक्षांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून ही पाऊले उचलली जात आहेत. सूत्रांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांनी या डॅमेज कंट्रोलसाठी अलीकडेच एक बैठक घेतली. ज्या मतदारसंघांमध्ये तिकीट वाटपानंतर किंवा महायुतीच्या फॉर्म्युला निश्चितीनंतर गडबड होऊ शकते, असे मतदारसंघ शोधण्यात आले आणि त्या मतदारसंघातील भाजप, संघाच्या अत्यंत निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
एकतर कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही याची काळजी आधी घ्या, असे निर्देश देण्यात आले. समजा बंडखोरी झालीच तर त्याची झळ पक्षाला किती बसेल? बंडखोर उमेदवार किती मते घेऊ शकतो आणि बंडखोरामुळे जो फटका बसणार आहे तो कसा भरून काढता येऊ शकेल, या बाबत पक्षात चिंतन सुरू आहे.