जवळा गटात भाजपाची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: February 18, 2017 03:10 PM2017-02-18T15:10:10+5:302017-02-18T15:10:10+5:30
जवळा गटात भाजपाची प्रतिष्ठा पणाला
जवळा गटात भाजपाची प्रतिष्ठा पणाला
सांगोला : जवळा जि. प. गटात आघाडी, महायुती व अपक्ष उमेदवारात तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे यांचे वर्चस्व असलेल्या जवळा जि़ प़ गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. कारणही तसेच असून भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी महायुतीच्या कोट्यातून हा गट आपल्याकडे घेतल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आघाडी व महायुतीच्या उमेदवाराला रेश्मा बनसोडे किती आव्हान देतात हेही औत्सुक्याचे ठरणार आहे. या गटातून जि. प. सदस्या जयमाला गायकवाड यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद व जि. प. अध्यक्ष होण्याचा मान मिळाला़ भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनाही या गटातून बिनविरोध होण्याची संधी मिळाली होती. असे असले तरी सध्याचे चित्र वेगळे आहे़ यंदाच्या निवडणुकीत जवळा गटाची पुनर्रचना झाली असून जवळा वगळता जवळा गणात नवीन गावे व वाढेगाव गण नव्याने समाविष्ट झाला आहे.
जवळा जि. प. गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव तर जवळा गण सर्वसाधारण महिला व वाढेगाव गण सर्वसाधारण जागेसाठी आहे. जि. प. च्या निवडणुका जाहीर होताच नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी व शेकापने आघाडी करून निवडणुका लढविण्याचे जाहीर केले़ इकडे महायुतीने नगरपालिका निवडणुकीतील महायुती कायम ठेवून श्रीकांत देशमुख यांनी जवळा गट भाजपकडे घेतला आहे. माजी आ. दीपक साळुंखे यांनी चाणाक्ष राजकारणातून स्वाती तुळशीराम कांबळे यांना उमेदवारी दिली़ जवळा गणातून आघाडीकडून सरिता कृष्णदेव साळुंखे व वाढेगाव गणातून नारायण शिवाजी जगताप यांना उमेदवारी देऊन गटात राजकीय डावपेच आखले आहेत.
---------------------------
महायुतीला आव्हान
महायुतीकडून मंगल प्रभाकर कसबे यांना उमेदवारी देऊन आघाडीला आव्हान दिले आहे. तर याच गटातून रेश्मा प्रभाकर बनसोडे यांचेही आव्हान असणार आहे. जवळा गणातून महायुतीने महानंदा लक्ष्मण खंडागळे या आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन आघाडीशी बरोबरी साधली आहे. वाढेगाव गणातून महायुतीने मेथवडेचे माजी सरपंच जगदीश पाटील या तुल्यबळ उमेदवाराला उमेदवारी देऊन आघाडीपुढे आव्हान ठेवले आहे. याच गणातून कोमल तारळेकर, सुरेखा वाळके या दोन अपक्ष महिला आघाडी व महायुतीला किती आव्हान देतात, हेही औत्सुक्याचे ठरणार आहे.