भाजपाच्या प्रकल्पाला सेनेचा खो

By admin | Published: July 15, 2017 02:04 AM2017-07-15T02:04:04+5:302017-07-15T02:04:04+5:30

शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करून भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावण्याचे मनसुबे आखले आहेत.

BJP's project lost its army | भाजपाच्या प्रकल्पाला सेनेचा खो

भाजपाच्या प्रकल्पाला सेनेचा खो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या विकासाचा आराखडा मंजुरीसाठी शेवटच्या टप्प्यात असताना शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करून भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावण्याचे मनसुबे आखले आहेत. मुंबईतील उद्याने, क्रीडांगणे आणि मनोरंजन मैदाने यांना नवीन विकास आराखड्यात धक्का लागू देणार नाही, तर आरे कॉलनीतील मेट्रोसाठीच्या आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा एकदा जुंपणार आहे.
२०१४-२०३४ या २० वर्षांचा मुंबईचा विकास आराखडा पालिका महासभेमध्ये लवकरच मंजूर होणार आहे. या मंजुरीनंतर राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे आराखड्याचा मसुदा पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे महापौर महाडेश्वर यांनी शुक्रवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका जाहीर केली. औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येमुळे आधीच मुंबईकरांचा श्वास कोंडत असताना त्यांच्यावर आणखी अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील मोकळ्या जागा, खेळाची मैदाने, उद्याने ही मुंबईकरांची फुप्फुसे आहेत. ती वाचली पाहिजेत. शिवसेनेची बांधिलकी ही मुंबईकरांशी आहे. त्यामुळे त्यांच्या हिताबाबत कोणतीही तडजोड शिवसेना करणार नाही, असा भाजपाला त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यासंदर्भात इतर पक्षांतील नगरसेवकांकडून अर्ज येण्याची शक्यता असल्याचे भाजपाचे नाव न घेता महापौरांनी सूचित केले. यामुळेच शिवसेनेने प्रथम भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.
>आरे कारशेडचा वाद कायम
गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही. मेट्रो कारशेडचा प्रस्ताव सुधार समिती आणि सभागृहातही नामंजूर केल्याचे निदर्शनास आणत भाजपाला एकप्रकारे शिवसेनेने आव्हानच दिले
आहे.
>मेट्रो कारशेडचा प्रस्ताव रखडला
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडसाठी आठ जागांमधून आरे वसाहतीची निवड करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीतील प्रजापूर आणि वेरावली येथील ३३ हेक्टर्स भूखंड निश्चित करण्यात आला आहे.तसेच प्रस्तावित विकास आराखड्यात या भूखंडावर कारशेडचे आरक्षण सुचविण्यात आले. मात्र आराखडा रखडल्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मागणी करताच या भूखंडाला ना विकास क्षेत्रातून वगळण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू झाली. पालिका निवडणुकीच्या काळात वचननाम्यात या प्रकल्पाचे आश्वासन भाजपाने मुंबईकरांना दिले आहे.त्यामुळे हा भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर साकार करण्याचे आव्हान भाजपा नेत्यांसमोर आहे. मात्र आरे कॉलनीतील जागा मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडसाठी सोडण्यास सेनेचा विरोध आहे. हा प्रस्ताव पुन्हा नामंजूर झाल्याने नियमांनुसार आता तीन महिन्यांनंतरच हा विषय प्रशासन पटलावर आणू शकेल. यामुळे मेट्रो प्रकल्पाला आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत.पालिका निवडणुकीच्या काळात वचननाम्यात या प्रकल्पाचे आश्वासन भाजपाने मुंबईकरांना दिले आहे.
>परवडणारी घरे
परवडतील काय?
मिठागरांवरील जमिनीवर आरक्षणे टाकून तेथे गरिबांसाठी ‘परवडणारी’ घरे उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. परवडणारी घरे ही नेमकी संकल्पना काय आहे, हे पाहावे लागेल. घरे बांधल्यानंतर त्याची किंमत जर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असेल तर या योजनेचा उपयोग होणार नाही, असे मत महाडेश्वर यांनी व्यक्त केले.

Web Title: BJP's project lost its army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.