शिवबंधनाला भाजपाचे रक्षाबंधनाने उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 08:09 PM2019-07-22T20:09:21+5:302019-07-22T20:10:00+5:30
कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने २१ लाख महिलांकडून २१ लाख राख्या जमा करण्याचे आदेश दिले.
पुणे: शिवसेनेच्या बहुचर्चित शिवबंधनाला अखेर भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रक्षाबंधनाचे उत्तर दिले. कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने २१ लाख महिलांकडून २१ लाख राख्या जमा करण्याचे आदेश दिले. यातून त्या महिला व त्यांच्या कुटुंबातील मतांचे गणित मांडत त्यांनी यामुळे राज्यात सत्ता येणारच अशी खात्री व्यक्त केली.
भाजपाच्यापुणे शहर शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक २८ मध्ये पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ तसेच स्थानिक नगरसेवक व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांमध्ये साधेपणाने राहून काम केले पाहिजे. मी अजूनही कुठेही राहू, झोपू, खाऊ शकतो. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान तसेच हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या तीन निवडणुकांमधील स्थिती अशी आहे की तिथे कसली लाट असो अथवा नसो विशिष्ट जागांच्या खाली पक्ष जातच नाही. हे तिथे भाजपा भक्कम असल्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्रात फक्त विधानसभेतच नाही तर महापालिकामध्येही असेच झाले पाहिजे. रस्ते केले म्हणजे सरकार चांगले आहे असे चित्र निर्माण होते, मात्र सामान्यांची कामे केली तर त्या कुटुंबात भाजपा माझा आहे असे चित्र होते. त्यावेळी कसली लाट असली नसली तरी तो मतदार भाजपालाच मत देतो.
काय करायचे हेही पाटील यांनी सांगितले. राखीपौर्णिंमा आली आहे. महिलांना सांगा मला राखी बांधता तर आपला भाऊ मुख्यमंत्री आहे, त्याच्यासाठीही एक राखी द्या. त्या महिलेला मुख्यमंत्र्यांनी कसे काम केले, काय काम केले त्याची माहिती द्या व नंतरच राखी द्या. राज्यातून अशा २१ लाख राख्या जमा झाल्या तर २१ लाख गुणिले किमान तीन याप्रमाणे तब्बल ६३ लाख मते होतात. राज्यातील मतदारांची संख्या ४ कोटी ५० लाख आहे. १ कोटी ७० लाख मते मिळाली तर राज्यात सत्ता नक्की आहे. त्यामुळे राखीपौर्णिमेला याप्रमाणे काम करा असा आदेशही पाटील यांनी दिला.
पाटील यांचा सत्कार करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सभागृहात झाली होती. शहराध्यक्ष गोगावले यांनी प्रास्तविक केले.