भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा
By admin | Published: October 17, 2014 01:06 AM2014-10-17T01:06:24+5:302014-10-17T01:06:24+5:30
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, त्यातच नाईलाजाने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देणे या दोन
गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसल्याची खंत
नागपूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, त्यातच नाईलाजाने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देणे या दोन बाबी त्यांनी राजीनाम्यासाठी पुढे केल्या आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी राजीनामा पाठविला. या राजीनाम्याची प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, श्रीकांत देशपांडे, भाजपचे प्रदेश सचिव चंद्रशेखर बावनकुळे, सहसंघटनमंत्री किशोर रेवतकर यांच्याकडेही पाठविल्या आहेत.
पोतदार यांनी प्रदेशाध्यक्षाकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, आपण कळमेश्वर तालुका कार्यकारिणी सदस्य ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंतच्या जबाबदारी गेल्या २२ वर्ष निष्ठेने सांभाळल्या. यावेळी सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची खात्री असताना सोनबा मुसळे यांना उमेदवारी दिली. तरीही त्यांच्यासाठी भाजपचे संघटन करून जोरदार कामाला सुरुवात केली. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. या मतदारसंघातून डमी उमेदवाराचा अर्ज भरला नसल्याने तसेच बी. फॉर्मचा उल्लेख केला नसल्याने आमच्याकडे पक्षाचा उमेदवारच राहिला नाही. नागपूर जिल्ह्याचे स्वत:कडे प्रतिनिधित्व असताना स्वत:च्याच मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसणे ही खेदजनक बाब आहे. उमेदवार नसल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आग्रह धरला. त्यानुसार पाठिंबा देत शिवसेना उमेदवारामागे शक्ती उभी केली.
या दोन बाबींची नैतीक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सोबतच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)