भाजपाची माघार
By admin | Published: March 5, 2017 05:19 AM2017-03-05T05:19:25+5:302017-03-05T05:19:25+5:30
पारदर्शकतेच्या नावावर आम्हाला जनतेने मतदान केले आहे. मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी कोणाशीही कसलीही तडजोड करुन भाजपा महापौरपद मिळवणार नाही.
मुंबई महापालिका : महापौर व उपमहापौर शिवसेनेचाच
मुंबई : पारदर्शकतेच्या नावावर आम्हाला जनतेने मतदान केले आहे. मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी कोणाशीही कसलीही तडजोड करुन भाजपा महापौरपद मिळवणार नाही. आमचे निवडून आलेले ८२ नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील. त्यामुळे मुंबईत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक भाजपा लढवणार नाही अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकली.
मुख्यमंत्री व भाजपाच्या या निर्णयामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर व उपमहापौर होण्याचा मार्ग खुला झाला आहे. शिवसेनेतर्फे शनिवारी महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर तर उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसतर्फे विठ्ठल लोकरे यांनीही अर्ज भरला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी दुरंगी लढत होणार आहे. ही निवडणूक बुधवारी होईल.
स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट या समित्यांचे अध्यक्षपदही भाजपा लढणार नाही, असे जाहीर करतानाच मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमला जाईल अशी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांच्या आणि शिवसेनेच्या कारभारावर अप्रत्यक्ष अंकूश ठेवण्याचेही दाखवून दिले. एकाच लोकायुक्तांकडे अवघ्या राज्याचा कारभार आहे. त्यामुळे नवीन उपलोकायुक्तांनी केवळ मुंबईसाठी काम करावे आणि पारदर्शक संस्थात्मक उभारणी करण्याचे काम यातून करावे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)
...तर मुंबईकरांवर अन्याय झाला असता!
महापौरपदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची वेळ शनिवारी संपत असतानाच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलावली. सेनेपेक्षा केवळ २ नगरसेवक कमी असूनही तोडफोड करून आमचा महापौर बसवू शकलो असतो. पण तसे केले असते तर ते मुंबईकरावर अन्याय केल्यासारखे झाले असते.
म्हणून कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही महापौरपदापासून कोणत्याच समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणा...
- समित्यांची अध्यक्षपदे नकोत.
- विरोधी पक्षनेतेपदही नकोच !
- मुंबईसाठी उपलोकायुक्त नेमणार
- पारदर्शक कारभारासाठी तडजोड नाही.
- तीन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त.
राज्यातील सर्वच पालिकांत पारदर्शकता यावी, म्हणून शरद काळे, रमानाथ झा व गौतम चटर्जी या तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमण्याची व त्या समितीच्या शिफारशी सगळ्यांना लागू करण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.
मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षनेतेपदही घेणार नाही. पण महापालिकेतील भ्रष्टाचार संपला पाहिजे म्हणून आमचे नगरसेवक परखड भूमिका घेतील. चांगल्या निर्णयासाठी शिवसेनेला मदत करतील, आमच्या मतांची जेथे गरज असेल तेथे ती दिली जातील. पण पारदर्शकतोशी तडजोड करणार नाही.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
विश्लेषण तुम्ही करा...
मुंबईत शिवसेनेचा महापौर होणार हे आम्ही जाहीर केले होते. भाजपाने काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. या निर्णयाचे राजकीय विश्लेषण जे काही करायचे ते माध्यमांनी करावे आमचा महापौर बसवणार हे नक्की झाले आहे.
- आ. अनिल परब, शिवसेना
निर्णयाचे स्वागतच...
शिवसेनेला बहुमत मिळाले होते. त्यामुळे आमचाच महापौर होणार हे नक्की होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे. त्यांनी मुंबईकरांच्या निर्णयाचा आदर केला आहे. हीच पारदर्शकता त्यांनी सगळीकडे आणावी, अशी भूमिका आम्ही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घेतली होती.
- दिवाकर रावते,
परिवहनमंत्री