भाजपाचे साई शेलार बिनविरोध
By admin | Published: April 6, 2017 03:54 AM2017-04-06T03:54:55+5:302017-04-06T03:54:55+5:30
केडीएमसीच्या कांचनगाव-खंबाळपाडा प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेले चारही अर्ज बुधवारच्या छाननी प्रक्रियेत वैध ठरले.
डोंबिवली : केडीएमसीच्या कांचनगाव-खंबाळपाडा प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेले चारही अर्ज बुधवारच्या छाननी प्रक्रियेत वैध ठरले. डमी अर्ज दाखल केलेले सिद्धार्थ शेलार यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार स्नेहल ऊर्फ साई शेलार यांची निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यामुळे १९ एप्रिलची निवडणूक टळली आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच साई यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.
कांचनगाव-खंबाळपाडाचे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे निधन झाल्याने त्यांच्या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी शिवाजी यांचे सुपुत्र स्नेहल ऊर्फ साई शेलार यांना भाजपाने उमेदवारी दिली. रविवारी साई यांनी, तर सोमवारी त्यांचे बंधू सिद्धार्थ यांनीही डमी म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले होते. बुधवारी चारही अर्जांची छाननी झाली. त्यात ते सर्व अर्ज वैध ठरले. त्यानंतर, सिद्धार्थ यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. परंतु, तत्पूर्वी सिद्धार्थ यांनी अर्ज मागे घेतल्याने साई यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने साई यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग सुकर झाला होता. (प्रतिनिधी)
आयोगाच्या मान्यतेनंतर अधिकृत घोषणा
शुक्रवारनंतर याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी देविदास टेकाळे यांच्याकडून निवडणूक आयोगाला पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतरच बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.