भाजपाच्या गोटात सामसूम, नांदेडमुळे विजयमालिका खंडित : निलंगेकर यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न फसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 03:59 AM2017-10-13T03:59:07+5:302017-10-13T03:59:56+5:30
नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसच्या येथील मुख्यालयात एकीकडे जल्लोषाचे वातावरण असताना भाजपाच्या गोटात मात्र पहिल्यांदाच सामसूम बघायला मिळाली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसच्या येथील मुख्यालयात एकीकडे जल्लोषाचे वातावरण असताना भाजपाच्या गोटात मात्र पहिल्यांदाच सामसूम बघायला मिळाली. एकामागून एक निवडणुका जिंकण्याची सवय असलेल्या भाजपाला नांदेडच्या निकालाने मोठा धक्का बसला.
या निवडणुकीची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी ठरविली होती. नांदेडमधील सर्व धुरा ही कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या दिमतीला पक्षसंघटनेचा माणूस म्हणून आ. सुजितसिंह ठाकूर यांना देण्यात आले होते. मात्र लातूरमध्ये यशस्वी झालेले निलंगेकर हे नांदेडमध्ये अपयशी ठरले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याऐवजी निलंगेकर पाटील यांना मराठवाड्यातील भाजपाचे नेते म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याच्या भाजपांतर्गत काही जणांच्या प्रयत्नांना यानिमित्ताने खीळ बसली आहे. भगवानगडाला आव्हान देत पंकजा मुंडे यांनी प्रचंड मोठा मेळावा यशस्वी करून दाखविला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात एकामागे एक विजय भाजपा मिळवित असताना ती विजय मालिका नांदेडमध्ये खंडित झाली. महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचे गड जसे त्यांच्या प्रभावामुळे शाबूत राहिले तसे एकमेकांचे गड अभेद्य ठेवण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये अलिखित सामंजस्य करार चालत आला आहे. त्या कराराला नांदेडच्या निमित्ताने सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चिन्हावर न लढविल्या गेलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचे दावे करणारे पत्रक प्रदेश भाजपाने लगेच काढले होते. मात्र, नांदेडची निवडणूक कमळावर लढूनही त्यातील निकालावर प्रदेश भाजपाने पत्रक काढण्याचे टाळले. केवळ निलंगेकर यांनी एक पत्रक काढून पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी-
मुंबई, पुणे, कोल्हापूर व नागपूर महापालिकेच्या प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी झाली. चारही जागा भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांनी जिंकल्या. मुंबईत भाजपाच्या जागृती पाटील यांनी शिवसेना उमेदवाराला पराभूत सहज विजय मिळविला.
पुण्यात आरपीआयने जागा कायम राखली. कोल्हापुरला भाजपा-ताराराणीच्या उमेदवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपा उमेदवाराचा केवळ ४६३ मतांनी विजय झाला.
पुणे महानगरपालिकेच्या कोरेगाव पार्कमधील प्रभाग क्र मांक २१ अ मध्ये भाजपा-आरपीआयच्या उमेदवार हिमाली कांबळे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय गायकवाड यांचा पराभव केला. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. हिमाली ही कांबळे यांची मुलगी आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक-११ मध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपा-ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर हे विजयी झाले. त्यांनी आघाडीचे उमेदवार व राष्टÑवादीचे शहराध्यक्ष राजेश भरत लाटकर यांचा पराभव केला. माजी नगरसेवक नीलेश देसाई यांचा जातीचा दाखल अवैध ठरल्यामुळे निवडणूक झाली. रत्नेश हे देसाई यांचे खंदे समर्थक आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ ं(अनुसूचित जाती)मध्ये काट्याच्या लढतीत भाजपाचे उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज भोरात यांचा ४६३ मतांंनी पराभव केला. भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.