राष्ट्रवादीच्या आंदोलनावर भाजपाची कडी

By admin | Published: May 17, 2016 01:59 AM2016-05-17T01:59:57+5:302016-05-17T01:59:57+5:30

तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुपे तलावात जनाई-शिरसाई उपसासिंचन योजनेतून पाणी सोडावे

BJP's stance on NCP's agitation | राष्ट्रवादीच्या आंदोलनावर भाजपाची कडी

राष्ट्रवादीच्या आंदोलनावर भाजपाची कडी

Next


बारामती : तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुपे तलावात जनाई-शिरसाई उपसासिंचन योजनेतून पाणी सोडावे, या मागणीसाठी (मंगळवारी) रास्ता रोको आंदोलनाची तयारी केली आहे. त्यांच्या या आंदोलनावर कडी करून भाजपाच्या नेत्यांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले. तसे आदेश पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर त्यांनी वरवंड येथील तलावाची पाहणीदेखील केली.
बारामती तालुक्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे, या स्थितीत सुपे परगण्यातील गावांसाठी जनाई-शिरसाई उपसासिंचन योजनेतून पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज (मंगळवारी) सुपे चौकात रास्ता रोको आंदोलनाची तयारी केली होती. त्यांच्या या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी भाजपाचे नेते पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीपराव खैरे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन मंगळवारीच वरवंड तलावातून सुपे तलावासह उपसासिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या तलावात पाणी सोडण्याची मागणी केली. त्यांनी तातडीने बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. मंगळवारीच जनाई-शिरसाई योजनेतून पाणी सोडण्यात येणार असल्याचे खैरे यांनी सांगितले, तर या योजनेतून पाणी सोडण्यासाठी आम्ही अगोदरदेखील मागणी, आंदोलन केले आहे. आमच्या आंदोलनामुळेच पाणी सोडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>राष्ट्रवादीकडून टँकरच्या पाण्याचे नियोजन
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकताच दुष्काळी दौरा केला. त्यामध्ये टॅँकरचे पाणी प्रतिमाणसी कमी पडते, असा नागरिकांचा सवाल होता. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या बारामती सहकारी दूध संघ, श्रायबर डायनामिक्स डेअरी कंपनी, सोमेश्वर येथील अक्षय फाऊंडेशनच्या वतीने २१ गावांमध्ये दिवसाआड २२ हजार लिटरप्रमाणे पाणीवाटपाचे नियोजन केले आहे. त्याचा प्रारंभ नुकताच झाला. त्यासाठी टॅँकरचे नियोजन अजितदादा मोटार वाहतूक संघाने केले आहे.
>शिवसेनेच्या वतीने मोफत टँकर सुरू
शासकीय टॅँकरने पाणी देण्याचे नियोजन केलेले असतानाच राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेनेदेखील मोफत टॅँकरने पाणी देण्याचे नियोजन आजपासून केले आहे. शिवसेनानेते बाबासाहेब धुमाळ, अ‍ॅड. राजेंद्र काळे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र पिंगळे यांच्या उपस्थितीत टॅँकर सुरू करण्यात आला.

Web Title: BJP's stance on NCP's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.